Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ एप्रिल, २०२६

मुंबई-आग्रा महामार्गावर रिक्षा चालकास मारहाण करून लूट करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद दिंडोरी पोलिसांची तत्पर कारवाई; दोन आरोपी अटकेत, एक फरार.




बापू चव्हाण दिंडोरी

   मुंबई-आग्रा महामार्गालगत जऊळके गावच्या शिवारात रिक्षा चालकास मारहाण करून रिक्षा, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण सुमारे ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना दिंडोरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे.या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.दि. १० एप्रिल २०२६ रोजी रात्री फिर्यादी हे त्यांची रिक्षा (क्र. एम एच १५ ई. एच २९१९) घेऊन नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील रिक्षा स्टॅण्डवर उभे होते. त्यावेळी तीन अज्ञात आरोपींनी संगनमत करून ‘गरवारे १० वा मैल येथे जायचे आहे’ असे सांगून रिक्षा भाड्याने घेतली. आरोपींनी रिक्षा मुंबई-आग्रा महामार्गाने १० वा मैल परिसरात आणून जऊळके बाजूस निर्जनस्थळी वळवली.तेथे आरोपींनी रिक्षा चालकास मारहाण करून त्याच्याकडील काळी-पिवळी रिक्षा, सुमारे ४ हजार रुपये रोख रक्कम, तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड, आरसी बुक व ड्रायव्हिंग लायसन्स असलेले पाकीट आणि सुमारे ९ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि पसार झाले. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांना डायल ११२ वर कॉल प्राप्त झाला.
या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अनोळखी असल्याने त्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तत्काळ पथक गठीत करून तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून नाशिकरोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.तसेच गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मुंबईहून नाशिककडे रेल्वेने येत असल्याची माहिती मिळाली.यानंतर पोलिसांनी नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. देवळाली कॅम्प स्टेशन येथे संशयित दिसताच पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर एक आरोपी पसार झाला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे –१) इरफान उर्फ पत्रा शेरू सय्यद (वय २६, रा. नानावली, नाशिक)२) जावेद सलीम पठाण (वय ३०, रा. भिमवाडी,नाशिक)
तर फरार आरोपीचे नाव नवाज मन्सूर शेख (रा. नाशिक) असे आहे.चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली रिक्षा व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.विशेष म्हणजे आरोपी जावेद पठाण याच्यावर नाशिक जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली असताना तो जिल्ह्यात आढळल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये आणखी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        सदर आरोपींवर यापूर्वीही नाशिक शहर परिसरात अशाच प्रकारचे पाच ते सहा गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे.या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,पोउपनि अल्ताफ शेख,सुदाम बांबळे तसेच पोलीस कर्मचारी विश्वनाथ काकड,सुमीत आवारी,विजय कोरडे,गेणु निंबेकर,प्रेमानंद मुंढे,कमलेश देशमुख,अविनाश आहेर,विशाल पैठणकर व तांत्रिक विश्लेषण विभागातील हेमंत गिलबीले,प्रदीप बहिरम यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.या कारवाईमुळे महामार्गावरील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असून दिंडोरी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध