Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ एप्रिल, २०२६
धार्मिक व राजकीय युतीच वाढत्या भोंदूगिरीला जबाबदार
सध्या महाराष्ट्रात नाशिकच्या अशोक खरातचे प्रकरण खूप गाजत आहे. महिलांचे लैंगिक शोषण, लैंगिक शक्तिवर्धक औषधे व प्रसाद म्हणून वाटप, बेनामी मालमत्ता, उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वरदहस्त अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत. देशातील आणि राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांची या भोंदू खरातसोबतची छायाचित्रे समोर येत आहेत.
या प्रकरणामुळे 'महाराष्ट्र हादरला', 'महाराष्ट्राचे एपस्टिन फाइल', 'मती गुंग करणारे प्रकरण' असे उल्लेख केले जात आहेत. अत्यंत खेदाची गोष्ट अशी की, प्रत्यक्षात आसाराम, रामपाल, गुरमीतसिंग रामरहीम असा गेल्या काही वर्षांतील प्रवास बघितला तर 'खरात प्रकरणा'चे आश्चर्य वाटावे अशी फारशी परिस्थिती राहिलेली नाही ! ज्याने महिलांचे शोषण केल्याचे असंख्य पुरावे आहेत आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात ज्याला शिक्षा झाली होती, तो गुरमीतसिंग ऊर्फ रामरहीम काही दिवसांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयातून सुटला. प्रत्यक्षात शिक्षा भोगत असतानादेखील हा गुरमीतसिंग बराच वेळ पॅरोलवर तुरुंगाच्या बाहेरच असायचा. ज्या आसारामने लहान मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा सिद्ध होऊन त्याला सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा दिली, त्याच आसारामचे पोस्टर लावून महाराष्ट्रात नुकताच 'मातृपितृ वंदन दिन' साजरा केला गेला, हेच सध्याचे समाजवास्तव आहे. सेक्स आणि क्राइम दोन्ही गोष्टी असलेली बातमी म्हणजे हमखास 'टीआरपी' हे माध्यमांचे पूर्वापार गणित ! या हिशेबाने आणखी काही दिवस माध्यमांत खरात प्रकरण गाजत राहील हे निश्चित. त्यानंतर मात्र 'सारे कसे सामसूम' अशी परिस्थिती निर्माण झाली तर फारसे आश्चर्य वाटायला नको !
'ऐसे कैसे झाले भोंदू' म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांपासून ते 'भोंदू आवडे सर्वांना' इथपर्यंत महाराष्ट्राची घसरण झालेली आहे. ही परिस्थिती निर्माण होण्यात राजकारण आणि धर्मकारण यांची झालेली युती हे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. *इंदिरा गांधी यांचे गुरू धीरेंद्र ब्रह्मचारी, नरसिंह राव यांच्या कालखंडातील चंद्रास्वामीच्या लीला किंवा महाराष्ट्रात अशोक चव्हाण, शिवाजी पाटील चाकूरकर यांचे सत्य साईबाबाच्या भजनी लागणे या गोष्टी काँग्रेस सत्तेमध्ये असताना घडत होत्या. भाजपच्या कालखंडात याच्या अनेक पावले पुढे टाकून या सर्व प्रकारचे 'संस्थीकरण' केले गेले आहे. *राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या शपथविधीला शंभर-दीडशे बाबांना बोलावतात आणि पूर्वी जाहीरपणे चमत्काराचा दावा करणाऱ्या एका बाबाकडे जाऊन 'धर्मसत्तेने राज्यसत्तेला मार्गदर्शन करावे' अशी अपेक्षा व्यक्त करतात, या गोष्टी फार जुन्या झालेल्या नाहीत.
गल्लोगल्लीचे बाबा-बुवा तर आहेतच, पण राजकीय वरदहस्ताने मोठे झालेल्या बाबा-बुवांची संख्या देखील काही कमी राहिली नाही. * चमत्काराने आजार बरे करू शकत असल्याचा दावा करणारे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम याचे अनेक व्हिडीओ आजदेखील समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत.
त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. प्रदीप मिश्रा नावाचा एक बाबा रुद्राक्षाचा वापर करून आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील असे जाहीर प्रवचनात सांगतो; आणि बहुतांश राजकीय पक्षांचे आमदार /खासदार यांचे कार्यक्रम आपल्या मतदारसंघात आयोजित करतात.
आपल्या समाजात 'सर्वधर्मसमभावा' ची परिस्थिती एकूण अडचणीची असली तरी
वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करता येऊ शकते. अंनिसने अनेक वेळा तक्रारी करूनदेखील पोलीस अशा लोकांची दखल घेत नाहीत. सत्ताधारी लोकांना त्यांच्याकडे बघायला वेळ नाही. यामधूनच पुढे जाऊन अशोक खरातसारखे भोंदू तयार होतात.
राजकारणी आणि बुवाबाजी यांची युती सर्वश्रुत आहे. दुसऱ्या बाजूला *बाबांचे भक्त म्हणून त्यांना मानणाऱ्या लोकांचा समूह आपला मतदार म्हणून जोडता येतो; आणि तिसऱ्या बाजूला या बाबाबुवांच्या माध्यमातून अनेक बेकायदा धंदे, राजकीय गणिते हेदेखील जुळवता किंवा बिघडवता येतात. 'धर्माची आणि राजकारणाची युती करून सत्तेचे पीक जोमाने काढता येते लोक अशा भोंदू बाबाबुवांना का बळी पडतात, हा एक लाखमोलाचा प्रश्न आहे.
आधुनिक मेंदूविज्ञानाचा आधार घेतला तर आपल्याला हे लक्षात येते की, 'मानवी मेंदूमध्ये जशी चिकित्सा करण्याची प्रवृत्ती आहे तशीच चमत्कारिक दाव्यांना बळी पडण्याची अंगभूत प्रवृत्ती आहे !' सातत्याने जाहिरातींचा मारा, बुवाबाजीला मिळणारी समाजमान्यता आणि राजाश्रय, शिक्षणातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक मनोभावाची जोपासना या गोष्टींना फाटा देणे यांमधून ती वाढते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आधीच दुय्यमतेचे जीवन जगणाऱ्या महिला याला अधिक बळी पडत असतील तर त्यामध्ये नवल ते कोणते ? 'चंगळवादी संस्कृती' यांची जोड मिळाल्यावर '
'भोंदू आवडे सर्वांना' अशी परिस्थिती का निर्माण झाली हे समजून घेताना आपण हेदेखील मनाशी पक्के समजले पाहिजे की, आपण सर्वांनी ठरवले तर ही परिस्थिती बदलणे अवघड नाही. त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सांगितलेली तीन सूत्रे* आजही तितकीच उपयुक्त आहेत.
त्यातले पहिले सूत्र म्हणजे, आपल्या संविधानाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला पाहिजे. शक्य तिथे त्याचा प्रचार आणि प्रसारदेखील केला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा साधा अर्थ म्हणजे 'जेवढा पुरावा तेवढा विश्वास'. हा वैज्ञानिक दृष्टिकोन केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित नाही, तर आपल्या जीवनाच्या सर्व अंगांमध्ये रुजणे आवश्यक आहे. यासाठी 'प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा हे असेच का अन् हे तसेच का?' ही संस्कृती मुलांमध्ये शालेय वयापासून खूप गांभीर्याने रुजवली पाहिजे. जसे कोविडची लस देऊन कोविडपासून मुक्ती मिळू शकते, त्याच प्रमाणे भोंदूगिरीपासून मुक्ती देणारी लस ही केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातच आहे. फरक एवढा की याचे डोस रोजचेच घ्यावे लागतात. दुसरा भाग आहे
विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचा.सर्व धर्मातील बुवाबाजी ही धर्मश्रद्धेच्या आडूनच चालू असल्याने धर्मचिकित्सा ही भोंदूगिरी रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. चिकित्सेने कोणताही धर्म उन्नतच होत असतो, त्यामुळे सर्व धर्मातील चिकित्सक प्रवृत्तींना पाठबळ देणे आवश्यक आहे. धर्माच्या विधायक चिकित्सेचा आग्रह धरणारे-मग ते कुठल्याही धर्मातील असोत - ते भोंदू बाबा-बुवांचे शत्रू आहेत आणि धर्मांतील जीवन उन्नत करणाऱ्या प्रवाहाचे मित्र आहेत, हे सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.
तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करण्याचा.
महाराष्ट्रातील जादूटोणा विरोधी कायद्याची निर्मिती हे त्याचे महत्त्वाचे रूप आहे. गेल्या बारा वर्षांत या कायद्यांतर्गत पंधराशेपेक्षा अधिक भोंदू बाबा-बुवांना तुरुंगाची हवा खायला लागणे हा त्याचा दृश्य परिणाम आहे. स्वाभाविकच आहे की या कायद्याच्या
सध्याच्या रूपात अनेक चांगले बदल करणे आवश्यक आहे. गेल्या बारा वर्षांमध्ये या कायद्याचे रखडलेले नियम तातडीने करणे, कायद्यांतर्गत तरतूद असलेल्या दक्षता अधिकारी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांना कार्यान्वित करणे, शासनानेच जीआर काढून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सुरू करणार म्हणून सांगितलेले 'अंधश्रद्धाविरोधी कक्ष' कार्यान्वित करणे, समाजमाध्यमांमधील भोंदूगिरीविषयी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश कार्यान्वित करणे अशा अनेक गोष्टी सहज करता येण्यासारख्या आहेत. या तीन सूत्रांना धरून आपण कार्यान्वित होणार की केवळ चार दिवस खरात प्रकरणाची चर्चा करून सोडून देणार... यावर 'भोंदू आवडे सर्वांना' ही परिस्थिती बदलणार की नाही
सी. एम. लोणारे
प्लॉट नंबर 15 दुबे नगर(सी) हुडकेश्वर रोड नागपूर
9960014116
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा