Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

नाशिकात भोंदूबाबा प्रकरण; RTO चे तीन अधिकारी चर्चेत; राजकारणी आणि अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग?



नाशिक (प्रतिनिधी) नाशिक जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण उघडकीस आले असून, लिंगपिसाट भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या मोहजाळात परिवहन विभागातील तीन वरिष्ठ RTO अधिकारी अडकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, अनेक उच्चपदस्थांवर संशयाची सावली गडद होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे गेल्या १० ते १५ वर्षांपासून या भोंदूबाबाने आपला तथाकथित ‘दरबार’ मांडला होता. या दरबारात राजकारणी, सरकारी अधिकारी आणि विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असल्याचे समोर आले आहे. आपल्या भविष्याचा फायदा करून देण्याच्या आमिषाने हा भोंदूबाबा अनेकांना जाळ्यात ओढत होता.
या भोंदूबाबाने महिलांना आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे, तसेच काही महिलांवर अत्याचार केल्याचेही आरोप आहेत. अनेक वर्षे सुरू असलेला हा प्रकार अखेर उघडकीस आला असून, “पाप फूटतेच” या उक्तीप्रमाणे या भोंदूबाबाचे काळे कारनामे समोर आले आहेत.
दरम्यान, नाशिक पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भोंदूबाबाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीतून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याच्याकडून काही संशयास्पद व्हिडिओ कॅसेट जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

या व्हिडिओ कॅसेटमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात असून, जर या कॅसेटची सखोल चौकशी झाली, तर परिवहन विभागातील RTO अधिकाऱ्यांसह इतरही काही मोठे अधिकारी चौकशीच्या कक्षेत येऊ शकतात.
माहितीनुसार, या तिघांपैकी एक अधिकारी मुंबईतील परिवहन विभागाच्या मुख्य कार्यालयात कार्यरत आहे, तर उर्वरित दोन अधिकारी खानदेशातील RTO कार्यालयात उच्च पदावर कार्यरत आहेत. इतकेच नव्हे, तर एका अधिकाऱ्याचा या भोंदूबाबाच्या ‘महोत्सवा’त थेट सहभाग असल्याचेही समोर येत आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी सुरू करण्यात आली असून, येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, पोलीस कस्टडीत असलेल्या भोंदूबाबाची कसून चौकशी सुरू असून, पोलिसांनी त्याला चांगलेच खडसावल्याची माहिती आहे. त्यामुळे तो सध्या गप्प बसल्याचे सांगितले जात आहे.
या सर्व प्रकारामुळे प्रशासन, राजकीय वर्तुळ आणि सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, “या प्रकरणात अजून किती मोठी नावे समोर येणार?” असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध