🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
🟥 एकतास येथील विश्वास नारायण पाटील (वय ४४) हे दुपारी शेतातील काम आटोपून भर उन्हातून घरी आल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या व झटके येऊ लागल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उष्णतेमुळे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.
🟨 निमगूळ (ता. शिंदखेडा) येथील सिंधुबाई रमेश बागुल (वय ६९) या नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी अमळनेर येथे येत असताना रेल्वे स्थानक परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्रचंड उष्णता व तापामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.
🟦 देवगाव देवळी येथील अनिल मंगल शिरसाठ (वय ३५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.
🟫 एलआयसी कॉलनीतील रहिवासी रमेश जगन्नाथ चौधरी हे लग्न समारंभासाठी बाहेर गेल्यानंतर उष्णतेमुळे आजारी पडले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. तसेच ढेकू येथील शंकर आनंदा पाटील यांचाही उष्णतेमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
⚫ तालुक्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे व आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा