पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे टाकरखेडा गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल हे आपल्या दोन मुलांसह पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडले होते. त्यांच्यासोबत दुसरीत शिकणारा मुलगा सनी तसेच अंगणवाडीत जाणारा राज हे दोन्ही मुले होती. त्यानंतर चौघांचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पहाटे सुमारे ४.४० वाजता मिळाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, तसेच पोलिस कर्मचारी विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक पंचनामा करून पुढील तपासाची कार्यवाही सुरू केली.
दरम्यान, एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या कुटुंबाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक कारणातून ही घटना घडली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू असली तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
आत्महत्येचे नेमके कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार असून, या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
प्रतिनिधी : गणेश चव्हाण
तरुण गर्जना

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा