Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६

अमळनेर शहर व तालुक्यातील अवाजवी वीजबिलांची चौकशी करण्याची मागणी

नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा

अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागाकडून होणाऱ्या विविध प्रकारच्या गैरप्रकारांच्या तक्रारी समोर येत आहेत. नवीन वीज मीटर बसविल्यानंतर प्रत्यक्ष वीज वापराच्या तुलनेत अवाजवी वीजबिले येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

विशेषतः काही ग्राहकांच्या अत्यल्प वीज वापराच्या ठिकाणी देखील अवाजवी रकमेची बिले प्राप्त झालेली आहेत. उदाहरणार्थ, एका दुकानदाराचे केवळ एका पंख्याचा अत्यल्प वापर असतानाही मागील महिन्याचे बिल रु. २१,०००/- इतके आले आहे. अशा प्रकारे बिलाबाबत महावितरण कार्यालयाकडे तक्रार करूनही ग्राहकांना समाधानकारक माहिती अथवा योग्य तोडगा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

तसेच सौरऊर्जा प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांनाही अवाजवी वीजबिले प्राप्त होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे अशा ग्राहकांच्या मीटर रीडिंग, आयात-निर्यात वीज (Import/Export), सौरऊर्जा निर्मिती व बिलिंग प्रक्रियेची योग्य प्रकारे तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन अवाजवी वीजबिलांची स्वतंत्रपणे तपासणी करण्यात यावी. दोषपूर्ण मीटर अथवा बिलिंगमध्ये त्रुटी असल्यास ती तात्काळ दुरुस्त करावी व पात्र ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने आकारलेली रक्कम कमी/समायोजित करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच नवीन मीटर बसविण्याची कोणत्याही प्रकारची अनावश्यक सक्ती होऊ नये व मीटर बदलण्याची आवश्यकता असल्यास त्याचे कारण तसेच त्यानंतरच्या बिलिंगबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वरील सर्व बाबींची तातडीने चौकशी करून अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने दिनांक १७/०९/२०२६ रोजी अमळनेर कार्यालयाच्या आवारात शांततामय उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध