Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२६

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत सभापती अशोक पाटील यांची शेतकऱ्यांसाठी ५१ हजारांची मदत


अमळनेर तालुक्यासह राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहेत. पावसाअभावी शेतीचे नुकसान होत असताना शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत करणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका सभापती अशोक पाटील यांनी घेतली.


वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ आणू नयेत तसेच कार्यकर्त्यांनी लावलेले वाढदिवसाचे बॅनरही काढून टाकावेत, अशा सूचना त्यांनी यापूर्वीच दिल्या होत्या. बाजार समितीच्या वतीने वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन असतानाही त्यांनी उत्सवापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्याला प्राधान्य दिले. त्यानुसार बाजार समितीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.


त्यानंतर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या कार्यालयात जाऊन सभापती अशोक पाटील यांनी त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीचा ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी बाजार समितीचे संचालक समाधान धनगर, सचिव डॉ. उमेश राठोड, सहसचिव सुनील पाटील, योगेश महाजन, अशोक वाघ आणि रणजित शिंदे उपस्थित होते.


वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा आणि सत्कार स्वीकारण्याऐवजी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आर्थिक योगदान देण्याचा हा निर्णय सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला आहे. सभापती अशोक पाटील यांच्या या उपक्रमातून शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधोरेखित झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध