विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी
देव माणसांत शोधायचा असतो. माणसांच्या वेदना माणसाला समजल्या नाहीत तो माणूस कसला ? आनंदाच्या डोहात बुडण्याचा आनंद आणि पांडुरंगाशी एकरूप होण्याचा सत्संग ज्या वारीतुन मिळतो ती आळंदीहून निघालेली वारी आज आषाढी एकादशीला पंढरपूरात दाखल होते आहे.
विमानाचा प्रवास करून, चार चाकी एसी गाड्यामधून प्रख्यात मंदीराचे दर्शन घेण्याचा आनंद आणि शेकडो मैल पायी चालत, विठ्ठलच्या भक्तांनी दिलेलं पाणी, भाकरी आणि पिठल खात टाळ-मृदंगाच्या लयीत नाचत विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याचा आनंद हा शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही. सातशे वर्षाची वारीची परम्परा आजही विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात साधनांचा आणि सुविधांचा वापर न करता, पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनाला आसूसलेला वारकरी खिशात किती पैसा आहे याचा अंदाज न घेता घरातुन बाहेर पडतो आणि वारीत सामिल होतो.
कोणतीही टूर्स नाही, ट्रॅव्हल नाही, पॅकेज नाही, हॉटेल नाही, निसर्गरम्य स्थळ नाही अशा या वारीने जगात उच्चांक गाठला आहे. “पंढरीला जाया हवं कशाला गाडी घोडं, पंढरीला जाया तुला कशाला हवं कुणी”. एकटेच पायी चालण्याचा, एकाच दिवशी लाखोंच्या संख्येने विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा काय वैशिष्ठ असेल या विठ्ठलाचे आणि या वारीचे ? तर विठ्ठल खर्या अर्थाने समाजवादी आहे. आणि या विठ्ठलाच्या वारीत सामिल होणारे समाजवादी
विचारसरणीचे उपासक आहेत. जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, हातात टाळ आणि गळ्यात मृदूंग, कपाळावर बुक्काचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखी एक नाव “जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल” पांडुरंग पांडुरंग, गुरू माऊली तुकाराम, सरकारची कोणतीही यंत्रणा शेकडो किलोमिटरच्या रस्त्यावर बंदोबस्तासाठी नाही, कोणतेही रेस्ट हाऊस, विश्राम भवन विश्रांतीसाठी नाही. आकाशाच्या छताखाली पाऊलं थांबतील तिथं विसावा घ्यायचा. विठ्ठल भक्तांनी दिलेला पिठलं भाकरीचा प्रसाद खायचा. सकाळ झाली की विठू नामाचा गजर करत आपल्या सांसारिक दुख:चा लवलेशही मनात न ठेवता
विठ्ठलाच्या पंढरीकडे निघायचे. एकमेकांचा त्रास जाणून घ्यायचा, कुणाचे पाय चेपायचे तर कुणाच्या पायाला मलन लावून द्यायचे. नात कोणत तर, फक्त ‘वारकर्याचं’. कारण या सर्वांचा एकच विश्वास तो म्हणजे
जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसवा ॥
देवा सांगो सुखदु:ख । देव निवारील भूख ॥
या अभंगातील या दोन ओळींचा अर्थ किती सहज आणि सोपा आहे. सुखदु:खाचा हिशेब बा-विठ्ठला जवळ सांगून विसावा घ्यायचा. दुखा:च निवारण तो करत बसेल. ज्ञान, कर्म आणि भक्तीचा हा समन्वय म्हणजे वारी. देवासोबत संत, घोडे, बैल, मेंढर या सर्व प्राणी मात्रांना समान महत्व म्हणजे वारी, द्वैत, अद्वैत, सगुण-निर्गुण यांचा मिलाफ म्हणजे वारी. आंनदाने जगायला शिकविणारी लाखो भक्तगणांची यात्रा म्हणजे वारी, स्वत:ला खुप काही शिकविणारी पंढरीची वाट म्हणजे वारी. मी आणि तु मधला भेद मिटवणारी वारी.
भक्तांच्या आणि भगवंताच्या भेटीचा सोहळा म्हणजे वारी. महाराष्ट्राच्या वैभवशाली संत परम्परेची आठवण म्हणजे वारी. यात पांडुरंग विटेवर उभा आहे. आई वडिलांच्या सेवेत रमलेल्या पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर, कमरेवर हात ठेवून विठ्ठल गंमत पाहतो आहे, युगानु-युगे. आई-वडिलांची सेवा आता वृध्दाश्रमांमध्ये परिवर्तीत झाली आहे. आणि ईश्वर सेवेचे व्हिडीओ आम्ही व्हायरल करून सात लोकांना पाठवतो.
उच्च शिक्षित असून सुध्दा आम्ही भूकेला माणसाला भाकर देत नाही पण मॉलमध्ये जाऊन अनावश्यक गोष्टींवर पैसे उधळतो. शेतकरी आत्महत्या करण्याच्या बातम्या 24 तास चालणार्या इलेक्ट्रानिक मिडियावर कधीही चघळल्या जात नाही. मात्र जातीय जणाव निर्माण करणार्या घटना इतक्या चघळतो की त्यातून अजून दूसरी घटना घडेल. प्रेमाची जागा वासनेने घेतली आहे. एकतर्फी प्रेमातुन सपासप वार करून आम्ही उमलणार्या कळ्यांचा निर्घृण खून करतो आहोत. गुरू-शिष्याचं नातं संपत चाललं आहे, नाती-पणतीच्या वयाच्या मुलींवर अत्याचार होत आहेत. शिक्षण वाढल पण संस्कृती विसरत चाललो
आहोत, आधुनिक साधन हातात आली पण माणूसकी विसरलो आहोत, माणसाचा-माणसावरून विश्वास उडाला आहे. नेत्याचा आपल्या पक्षावर आणि पक्षनेत्यांवर विश्वास राहिलेला नाही, कोण कोणत्या पक्षाचा नेता याच स्मरण राहत नाही. एका रात्रीतून निष्ठा बदलत आहेत. सेवा संपली स्वार्थ वाढला आहे. निष्ठा संपली विष्ठा, खाण्यात धन्यता मानली जाते आहे. अन्याय-अत्याचार जातीत विभागले गेलेत. रंगाची जागा धर्माने घेतली. बा-विठ्ठला, कानडा ओ विठ्ठलू, कर्नाटकू तेणे मज लागियेला वेडू, कारण देशातली सत्ता कमी पडली की काय म्हणून कर्नाटकमध्ये आम्हाला काहीही करून सत्ता हवी आहे. फोडा-फोडी, तोडा-तोडी, झोडा-झोडी हाच आता आमचा ‘संप्रदाय’ झाला आहे. म्हणून बा-विठ्ठला आषाढी
एकादशीच्या निमित्ताने सगळ्यांना सदबुध्दी दे, आणि आत्महत्या करणार्या माझ्या शेतकर्यांना शक्ती दे, आत्मबल दे, चैतन्य दे, आनंद दे. त्याच्या जीवनातल्या सर्व वेदना सर्व दुखे: हिरावून ने रे माझ्या विठ्ठला. एव्हढेच तुजपाशी माझे मागणे. विठ्ठल विठ्ठल जय हारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा