
नाशिक: प्रतिनिधी :गांधी जयंतीपासून एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिक वापरावर केंद्र सरकारकडून बंदी घातली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर लघु, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या खादी ग्रामोद्योग आयोगाने बांबूच्या बाटल्यांची निर्मिती केली आहे. दि.1 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बाटलीचे अनावरण करण्यात येणार आहे.
या बांबू निर्मित बाटलीची क्षमता 750 मिली असून तीनशे रुपयांपासून तिची किंमत असणार आहे. गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच दि. 2 ऑक्टोबरपासून या बाटलीची विक्री खादी स्टोअर्स मधून करण्यात येणार आहे. या बाटल्या पर्यावरणाला पुरक असून, टिकाऊ देखील आहेत. प्लास्टिक वस्तुंना पर्याय म्हणून खादी ग्रामोद्योग आयोगाने प्लास्टिक ग्लासच्या ऐवजी पर्याय म्हणून कुल्लडची निर्मिती करायला सुरुवात केली आहे.
या प्रक्रियेतर्गत आतापर्यंत मातीचे 1 कोटी कुल्लड बनवण्यात आले आहेत. आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत 3 कोटी कुल्लड बनवण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे खादी आयोगाचे चेअरमन वी. के. सक्सेना यांनी म्हटले आहे. बांबूच्या बाटल्यांची विक्री सुरू झाल्यास, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.
भारत बांबू चे उत्पादन जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. मात्र आपण याचा उपयोग 5 टक्के देखील करत नाही. तर चीन मात्र आपल्या फर्निचरमध्ये 90 टक्के बांबूचा वापर करतो. प्लास्टिक बंदीच्या निमित्ताने का होईना बांबूपासून बाटल्या बनवण्याचा प्रयोग राबवला जात असून यामुळे एकदा वापर होणार्या प्लस्टिक बाटल्यांमुळे होणारे प्रदूषण थांबण्यास हातभार लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा