Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ घोषित.. अमरावती विभागातून शेगाव तालुका पत्रकार संघ पुरस्काराचा मानकरी



प्रतिनिधी:शेगाव:पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या व राज्यातील 354 तालुक्यात शाखाविस्तार असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी राज्यातील जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येते. 
राज्यातील तालुका पत्रकार संघाच्या मेळाव्यात दरवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा होत असतो. यंदाचा हा पुरस्कार वितरण सोहळा आणि मेळावा सोलापूर जिल्हयात अक्कलकोट येथे 8 फेब्रुवारी 2020 रोजी संपन्न होत आहे. त्यानुषंगाने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी  2019 च्या आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या नावाची घोषणा आज केली आहे.

रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा संघ पुरस्कार यंदा सांगली जिल्हा पत्रकार संघाला घोषित कऱण्यात आला आहे.

वसंतराव काणे यांच्या नावाने राज्याच्या प्रत्येक विभागातून एक या प्रमाणे आठ तालुक्यांची निवड केली जाते आणि त्यांना सन्मानित करण्यात येते. पत्रकार संघटन, परिषदेच्या उपक्रमातील सहभाग, सामाजिक कार्य आदि गोष्टींचा निवड करताना विचार केला जातो. यात अमरावती विभागातून बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुका पत्रकार संघाची निवड करण्यात आली आहे.

शेगाव तालुका पत्रकार संघाने 6 जानेवारी या पत्रकार देण्याची सर्वात आधी मुहूर्तमेढ बुलढाणा जिल्ह्यात रोवलेली आहे.

पत्रकारांचे प्रेरणा स्थान आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकरांचे नांव मैदानाला दिले आहे हि घटना महाराष्ट्रात प्रथमच शेगांवला झाली तसेच विविध सामाजिक उपक्रमात हा पत्रकार संघ सदैव आघाडीवर असतो. 

2017 ला पार पडलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या 41व्या राष्ट्रीय अधिवेशनात शेगाव तालुका पत्रकार संघाचे भरीव सहकार्य राहिले होते. संतनगरी शेगावला राज्यभरातून येणार्‍या पत्रकारांच्या व्यवस्थेतही शेगावतील पत्रकार सहकार्य करतात. शेगाव तालुक्याने राज्याला अनेक आदर्श पत्रकारही दिलेले आहेत. 

बुलढाणा जिल्हास्तरीय एकमेव दैनिक सर्वात आधी शेगाववरूनच निघाले. मराठी पत्रकार परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमात शेगाव पत्रकार संघाचा सक्रीय सहभाग असतो. या व विविध कार्याची दखल घेत शेगाव तालुका पत्रकार संघाची निवड अमरावती विभागातून आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.

जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना 8 फेब्रुवारी 2020 रोजी अक्कलकोट येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि परिषदेचे स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. 

पुरस्कार प्राप्त सर्व जिल्हा आणि तालुका संघाचे एस.एम.देशमुख, परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र काळे, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी अभिनंदन केले आहे. मागील सर्व तालुका पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याप्रमाणेच अक्कलकोट मेळावा देखील यशस्वी करायचा असल्याने राज्यातील सर्व तालुका संघांचे पदाधिकारी तसेच पत्रकारांनी मोठया संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी  केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध