Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०
"सोळावं वरीस धोक्याचं नाही, तर सोळावं वरीस मोक्याचं!"
अनुराग जगदाळेने सोळाव्या वर्षी संगीत विशारद पदवी मिळवून सार्थ ठरवली वरील उक्ती!
धुळे:प्रतिनिधी:माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील आदर्श विद्यामंदिराचा माजी विद्यार्थी तथा धुळे येथील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित- झेड.बी.पाटील महाविद्यालयातील अकरावीचा विद्यार्थी अनुराग भगवान जगदाळेने अवघ्या सोळा वर्ष वयात मुंबईच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गायनातील संगीत विशारद पदवी परीक्षेत 66.37% गुण मिळवून यश संपादन केले.
माळमाथा परिसरासह तालुक्यातून सर्वात कमी वयात संगीत विशारदची पदवी मिळवून त्याने निजामपूर-जैताणेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित- झेड.बी.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.पवार, उपप्राचार्य डॉ.सी.एन. पगारे, उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील, उपप्राचार्या प्रा.अनिता पाटील, मराठी विभागाच्या प्रा.डॉ.योगिता पाटील, इंग्रजी विभागाच्या प्रा.डॉ.वर्षा पाटील, संगीत विभागाच्या प्रा.संगीता जगदाळे आदींनी अनुरागचे पेढे भरवून अभिनंदन केले. तर आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड.शरदचंद्र शहा यांच्यासह संचालक मंडळातर्फे वडिलांसह अनुरागचा विशेष सत्कार झाला.
पहिलीत असतानाच, वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी मातृछत्र हरपलेल्या अनुरागने वडिलांसह कुटुंबियांच्या खंबीर पाठिंब्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वयाच्या सोळाव्या वर्षी अतिशय जिद्दीने संगीत विशारदची पदवी संपादित केली. शालेय शिक्षण सांभाळून त्याने सलग सात वर्षे ही साधना केली. गायनात प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण, मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, विशारद प्रथम, विशारद पूर्ण अशा सात परीक्षा तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. गेली तीन ते चार वर्षे त्याने शाळा सांभाळून निजामपूर ते नंदुरबार ये-जा करत संघर्षातून गायनाचे शिक्षण घेतले. दहावीतही त्याने 76टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते.
अनुरागने सारेगमप, संगीत सम्राटच्या ऑडिशनसह जिल्हास्तरीय, विभागस्तरीय युवा महोत्सव, कला महोत्सव व चेतक फेस्टिव्हलसह विविध गायन स्पर्धांमध्येही यशस्वी सहभाग नोंदवला आहे. अनुरागच्या वडिलांनी गायनात प्रवेशिका पूर्ण, तर मोठा भाऊ आशुतोषनेही मध्यमा प्रथमपर्यंत संगीत शिक्षण घेतले आहे. "आगामी काळात गायनासह संगीत क्षेत्रात करिअर करायचं आहे", अशी प्रतिक्रिया अनुरागने दिली. अनुराग जगदाळे हा येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीचे शिक्षक प्रा.भगवान बापूजी जगदाळे यांचा लहान मुलगा आहे. अनुरागला नंदुरबार येथील सुरसिंगार संगीत विद्यालयाच्या संचालिका तथा संगीतगुरू पं.नलिनीबुवा रोकडे, गोविंदबुवा रोकडे, दीपालीबुवा रोकडे, सारंगबुवा रोकडे, राकेश खैरनार आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले.
छायाचित्र क्रमांक-1
निजामपूर (ता.साक्री) : प्रथम श्रेणीत संगीत विशारद उत्तीर्ण झालेल्या अनुराग जगदाळेचा वडिलांसह आदर्श विद्यामंदिरातर्फे सत्कार करताना संस्थाचालक ऍड.शरदचंद्र शहा. शेजारी प्राचार्य व संचालक मंडळासह उपस्थित अन्य मान्यवर!
छायाचित्र क्रमांक-2
धुळे : गायनात प्रथम श्रेणीत संगीत विशारद उत्तीर्ण झालेल्या अनुराग जगदाळेचे पेढे भरवून अभिनंदन करताना झेड.बी.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.पवार!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा