Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ मार्च, २०२०
आज ही भावकी भावकीत वादाचे डोंगर उभे असतांना दिसतात... श्री अर्जुनभोई, मुंबई
आमची भावकी चांगली आहे... असे म्हणणारे फार दुर्मिळ आहेत. आमच्या सारखी भावकी कोणाचीच नाही... असे म्हणणारे खूप आहेत. खरेच काही ठिकाणी आपल्याच रक्ताची माणसे एकमेकांशी एवढी विकृत का वागत असावीत? हे एक कोणालाच न सुटलेले कोडे आहे.
याच भावकीच्या काही वादापायी अनेक पिढ्या, घरे, घराणी यात भूईसपाट झाल्याचा आपला इतिहास आहे. मी ही भावकिच्या वादाचा शिकार आहे... परंतु काही बाबी भावकिच्या समोर ठेवून सत्य काय आणि असत्य काय याचा उलगडा करण्यात समाधानी सुध्दा आहे आणि तिच धन्यता ही माझ्या मातापित्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनाचा सार आहे असे ही मला वाटते. इतिहासात आपण पाहतो की, शहाजीराजे, शिवराय, शंभूराय यांनाही भावकिच्या झळा लागलेल्या आहेत.
पुण्यातील पेशव्यांनी तर यात कळस गाठला होता असे लेखनही आपण वाचन करतो. ती इतिहासाची पाने तर रक्तरंजीत आहेतच थोडक्यात भावकिच्या वादावादातून कोणाचीच सुटका झाली नाही, होत नाही कारण तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला दुबळा समजून त्रासच दिला जातो.
भावकीतील व्यक्तीला नमवीण्यात एक वेगळाच अहंकार, गर्व काहींत दडलेला असतो त्याचा आनंद व्यक्त करण्यात काहींना एक असूरी आनंद होत असतो. आज दिवाणी खटले, फौजदारी गुन्हे, शेतजमिनीचे वाद यात भावकीच्या भांडणाचा क्रमांक नेहमी पहीला लागतो. उत्पन्नाचा किती भाग आज समाज यावर खर्च करतोय? अल्प असलेल्या आयुष्यात किती वेळ सत्कारणी लागतोय? आणि पुढच्या पिढीला आपण काय देतोय? माझ्या समाजातील तरुणांनो... हे प्रश्न जरी आपण स्वतःला दररोज विचारले तरी आपल्यात बदल होऊ शकतो आणि हेच आपल्या हातात आहे आणि तो बदल आपल्याला सामाजिक पातळीवर करायचा आहे.
आजही काही ठिकाणी संघटन संघटनातील, संस्था, दलं, संघ, राजकिय, सामाजिक परिषदातील काही भाग हा आपल्याला भावकिच्या कलहातील वादांकित मोहर उमटल्याची किंवा उमटविल्याची दिसत असते. भावकीला बदलवणे शिवरायांना जमले नाही, पेशव्यांनाही जमले नाही, आपल्यालाही ते जमणार नाही की काय? परंतु बदल करावयाचा असेल तर आपण स्वतःत केला पाहीजे. धाकटे असाल तर
सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका यातुनच महान संदेश आपण देऊ शकतो आणि त्या कृतीयुक्त संदेशातुन परिवर्तनाची विशाल मालिका निर्माण होऊन काही तरी प्रमाणात आपण हातभार ही भावकीला लाऊ शकतो
भावकीत बोलताना शक्यतो प्रतीहल्ला टाळा, त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया टाळा, त्यांनी खोडी काढली तर प्रतिशोध टाळा, सर्वात महत्वाचे भावकीची निंदा करणे सोडून द्या आणि दुसरा कोणी आपल्या भावकीची निंदा करत असेल तर ती अजिबात ऐकून घेऊ नका आणि सहनही करू नका. समोरुन साद घातला तर प्रतिसाद द्यायला विसरू नका भावकीच्या यशाचे मन आणि तोंडभरून खरे कौतुक करायची सवय लावून घ्या. अडचणीच्या काळात मदतीचा हात स्वतःहोऊन पुढे करा कारण भावकी मेली तरी भावकीच्या पुढे काही मदतीसाठी हात पसरवत नाही तो हात आपण समोर केला तर त्याच्यासारखे दुसरे समाधान नाही. हे सर्व खूप अवघड आहे पण आजच्या काळात खूप गरजेचे पण आहे कारण आपण सर्वजण खूप अडचणीत आणि संकटात आहोत या क्रियेने एकवेळ भावकीची साथ नाही मिळाली तरी चालेल पण भावकीचा त्रास वाचला तरी हे थोडे नाही. आयुष्यातील निम्मी शक्ती, संपत्ती आणि बहूमुल्य वेळ आपला यातच वाया चालला आहे.
सुधारायचे असेल तर ही शक्ती, संपत्ती आणि वेळ सत्कारणी लावता आली पाहीजे. भावकीच्या भांडणात देवही हरला आहे तो जिंकला असता तर महाभारत घडलेच नसते. भावकीतील वाद संपवणे हे देवापेक्षा मोठे काम आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करावेत हीच माफक अपेक्षा ठेऊ या. म्हणूनच आमच्या पूर्वजांनी, संस्कृतीने अंतिम यात्रेत चार पैकी तिन खांदेकरी भावकीचे असावेत ही अट घातली आहे. कितीही भांडा प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच होणार आहे... खुप मोठे होण्याच्या नादात तुम्ही तुमचा सामाजिक साधेपणा विसरू नका लक्षात ठेवा, समुद्रात विलीन झाल्यावर नदीसुधा खारट होते. बघा काय सुधरायला जमतेय का? आम्ही आपल्या सकारात्मक मताचा स्विकार करत बसलो आहे. आपल्या भावकीतला आपलाच एक समाजबांधव, आपलाच एक समाजघटक...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...
-
शिरपूर प्रतिनिधी:- तालुक्यातील जमीन व्यवहारांमधील घोटाळ्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नुकतेच उघडकीस आलेल्या उंटावद शिवारातील आदिवासी...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा