Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

फैजपूरात नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचा पडला विसर



फैजपुर प्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी व लॉकडा घोषित करण्यात आले आहे. नागरिकांचा एकमेकांशी होणारा स्पर्श व संपर्क टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्याचे आवाहन जीव तोडून केले जात आहे. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांकडून तसेच बँक व इतर ठिकाणी माकिंग करून सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना असताना सोशल डिस्टन्सिंगचा सामान्यांनाच विसर पडल्याचे चित्र फैजपूर शहरात पहावयास मिळत आहे. त्यामुळे यांना कोणीतरी आवरा हो असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) ही संकल्पना कृतीत आणण्यासाठी प्रत्यक्षात अनेकांना कानाडोळा सुरू असल्याचे दिसते. दूध डेअरी, मेडिकल व बँकेतही नागरिक दाटीवाटीने गर्दी करून असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे किराणा स्टोअर्स, भाजी बाजारात सोशल डिस्टन्सिंगच्या खुणा करण्यात आल्या. काही ठिकाणी नागरिक सामाजिक दायित्वाचे भान ठेवत आहेत तर अनेक जण नियम पायदळी तुडवीत आहेत.

जिल्ह्यात मोठ्या शहरातून व राज्यातून नागरिक दाखल झाले आहेत. या सर्वांचे विलगीकरण करून त्यांना होम क्वारटाइन केले आहे. आरोग्य यंत्रणा सतर्कतेने काम करीत आहे. संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत असून जिल्हाधिकारी स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने लोकांची काळजी घेतली जात असली तरी लोकांच्या अतिउत्साही, बेजबाबदारपणा व बेपर्वाईमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी दोन व्यक्तीमध्ये कमीत कमी ३ फुटाचे (१ मोटर) अंतर असणे गरजेचे आहे.

सध्या आठवडी बाजार बंद आहे. शहरात अनेक ठिकाणी बाजार भरविला जात आहे. प्रत्येक घरातून एकच व्यक्ती अत्यावश्यक खरेदीसाठी बाहेर पडेल याची खबरदारी पालिकेतर्फे घेतली जात आहेत. तरीही दुकानात शिस्तबद्धरीत्या खरेदी करण्यास फाटा दिला जात आहे. खरेदी करताना कोरोनाचे भान राहत नाही. ग्राहक सरळ गर्दीत घुसत आहेत. एकत्र गर्दी जमवत आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. ठराविक अंतरावरून साहित्य खरेदी करता यावे यासाठी अनेक ठिकाणी ‘सोशल डिस्टन्स’ चे पट्टे ओढण्यात आले. पहिल्या दिवशी या गोलातून उभे राहून काहीजणांनी खरेदी केली. मात्र, त्यानंतर या व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. विक्रेत्यांसह नागरिकही ‘सोशल डिस्टन्स’ चे भान न ठेवता सर्रास गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. शहरात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित नाही. ही चांगली बाब आहे. परंतु, पुढील १४ तारखेपर्यंत नागरिकांनी कसोशीने याचे पालन करणे काळाची गरज आहे.

बँकांसमोर लागल्या रांगा

सोशल डिस्टन्सिंगला सर्वाधिक हरताळ बँकांमध्ये फासला जात आहे. नागरिक मोठ्या संख्येने बँकेत गर्दी करीत आहेत. विशेष म्हणजे सध्या नागरिकांची बँकेत गदी टाळण्यासाठी फक्त रोखीचेच व्यवहार करण्याचे आदेश आहेत. सोयीसाठी असलेल्या एटीएम सेंटरमध्ये खडखडाट आहे. त्यामुळे नाइलाजाने ग्राहक बँकेत धाव घेत आहेत. त्याचप्रमाणे पीककर्ज भरण्याची अंतिम मुदत ही ३१ मार्च आहे. मुदत वाढविल्याचे अधिकृत आदेश बँकांपर्यंत आलेले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातही शेतकरी बँकेत दाटीवाटीने रांगेत लागत आहेत. यामुळेही सोशल डिस्टन्सिंगचा शहरात फज्जा उडाल्याचे चित्र आहे .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध