Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ११ मार्च, २०२६

शिरपूर तालुक्यात आदिवासींच्या जमिनींवर गैर- आदिवासींनी मारला डल्ला; नावासहित महसूल मंत्र्यांकडे तक्रार, लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप



शिरपूर |प्रतिनिधी :
नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील संशयास्पद जमीन खरेदी-विक्रीचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीररीत्या हडप करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, संबंधित गैर-आदिवासी धनदांडग्यांची नावासहित तक्रार थेट महसूल मंत्र्यांकडे आमच्या प्रतिनिधीमार्फत दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील काही शिवारांमध्ये आदिवासी समाजाच्या नावावरील जमिनी नियमांना हरताळ फासून गैर -आदिवासी व्यक्तींनी खरेदी-विक्री केल्याचा प्रकार समोर येत आहे. अनुसूचित जमातींच्या जमिनींच्या व्यवहारांवर कायदेशीर निर्बंध असतानाही बनावट कागदपत्रे, संगनमत आणि महसूल यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे व्यवहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या व्यवहारांमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. काही प्रभावशाली धनदांडग्यांनी आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेतल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

महसूल मंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्यास शिरपूर तालुक्यातील जमीन व्यवहारातील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता या तक्रारीनंतर महसूल विभाग कोणती कारवाई करते, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध