Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० मार्च, २०२०

पर्यावरण रक्षणासह वाचनसंस्कृती जोपासण्याचा अनोखा संदेश; चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणासह शिवचरित्र वाटप!



धुळे (प्रतिनिधी) : वाढदिवसाला केवळ केक कापून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण न करता वृक्षारोपणासह शिवचरित्र वाटप करून निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये चिमुकल्याचा अनोखा वाढदिवस साजरा झाला. 

आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलचे शिक्षक सुशीलकुमार जगदाळे व रामरावदादा पाटील आश्रमशाळेच्या अधिक्षिका रुपाली माळी यांनी त्यांचा तीनवर्षीय चिमुकला श्रेयसच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी सकाळी दहाला हा उपक्रम राबविला. आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड.शरदचंद्र शहा प्रमुख पाहुणे होते.

श्रेयसच्या वाढदिवसानिमित्त आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्रांगणात ऍड.शहा, मार्गदर्शक शिक्षक अशोक पानपाटील, प्रा.भगवान जगदाळे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यात अशोक, मोगरा आदी वृक्षरोपांचा समावेश आहे. दरम्यान जगदाळे परिवारातर्फे आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलच्या ग्रंथालयास कॉ. गोविंद पानसरे लिखित "शिवाजी कोण होता?" हे शिवचरित्र ग्रंथही भेट देण्यात आले. पर्यावरण रक्षणासह वाचनसंस्कृती जोपासण्याचा अनोखा संदेश त्यानिमित्ताने देण्यात आला.

ऍड.शहा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी व सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी शिवचरित्र वाचन करणे आवश्यक असून शिक्षकांनीही शिवचरित्राचे वाचन करून शिवरायांचा खरा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. यावेळी मार्गदर्शक शिक्षक अशोक पानपाटील, मुख्याध्यापक चंद्रकांत शिंपी, शिक्षक सुशीलकुमार जगदाळे, हेमंत देवरे, शिक्षिका नम्रता बागले, योगिता भट, पूनम माळी, भारती अहिरे, ललिता सूर्यवंशी, लीना भदाणे, नाजूका गांगुर्डे, नूतन पवार, गौरी विसपुते, शारदा मोहने, रुपाली माळी, श्रुती जगदाळे, श्रेयस जगदाळे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध