Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

धुळे जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.


धुळे:प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व कार्यालयप्रमुख व त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने सर्व शासकीय कार्यालये पाच टक्के कर्मचारी वृंदासह सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत. ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर विविध कामे मुदतीत पार पाडण्याची प्रक्रिया युध्दपातळीवर सुरू असून अनेक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘कोरोना’ विषाणूशी संबंधित शासनस्तरावरुन प्राप्त निर्देशानुसार विविध कामे, माहिती वेळेत तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांची कुठल्याही कामासाठी तातडीची गरज भासू शकते. या पार्श्वभूमीवर जे अधिकारी मुख्यालयात हजर नाहीत किंवा मुख्यालय सोडून बाहेर जाणे- येणे करीत आहेत, त्या सर्व अधिकाऱ्यांनी तत्काळ आपापल्या कार्यालयात, मुख्यालयात उपस्थित राहावे.

तसेच कोणीही जाणे- येणे करू नये किंवा पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील कोणीही अधिकारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडत असेल किंवा जाणे- येणे करीत असल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाईस संबंधित अधिकारी पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध