Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० मार्च, २०२०

आईच्या स्मृतिदिनाचे औचित्य : लॉकडाऊनमुळे प्रभावित निराश्रीतांना अन्नदान


रावेर प्रतिनिधी निभोरा येथील रहिवाशी  जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी आपल्या मातोश्रींच्या सातव्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधत कोरोनामुळे जाहिर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या ३०० निराश्रीतांना अन्नाचे पॅकेट वाटप केले. समाजोपयोगी या स्तुत्य उपक्रम निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान संचलित फूड बँकेच्या वतीने राबविण्यात आला.

स्व.कलाबाई देविदास ठाकरे यांचे ३० मार्च रोजी ७ वर्षांपूर्वी स्वाईनफ्लू या संसर्गजन्य आजाराने आकस्मिक निधन झाले होते.आज तसाच विषाणुजन्य संसर्ग असलेल्या कोरोनाने थैमान घातले असल्याने सरकारने २१ दिवस लॉकडाऊन जाहीर केलेले आहे.तथापि आश्रय नसलेल्या अनेक वंचितांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.जळगाव शहरातील अशा गरजूंना ठिकठिकाणी सकाळी ११ ते १ वाजता भोजनाची पाकिटे वाटप करण्यात आली. 

जनसंग्राम संघटनेचे संस्थापक तसेच परिट (धोबी) समाजाचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे,जनसंग्राम न्यूजच्या संपादिका सौ.मनीषा ठाकरे, निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान संचलित फूड बँकचे व्यवस्थापक धिरज जावळे सर,शहर वाहतूक शाखेचे सहाय्य्क फौजदार संजय नाईक व नामदेव माळी,ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनार,पत्रकार आनंद गोरे यांच्या हस्ते सामाजिक बांधिलकीतून हे अन्नदान करण्यात आले.

जनसेवा प्रतिष्ठान संचलित फूड बँक गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यावरील बेघर व निराश्रीतांना दैनंदिन भोजन वाटप करीत आहे.

त्यात सहभागी होऊन आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त आज अन्नदान करण्याचे भाग्य लाभल्याने आमच्या वैकुंठवासी मातोश्रीला हीच खरी श्रद्धांजली आम्ही मानतो अशी भावना श्री.ठाकरे यांनी व्यक्त केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध