Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

महामारीत फैजपूरातील दानशूरांना प्रसिद्धीचा मोह आवरेना



फैजपूर प्रतिनिधी आज सर्व जग कोरोनाने होरपळून निघत आहे. प्रत्येकाच्या मनात धास्ती आहे ती कोरोना या संसर्गजन्य विषाणूंची. आपल्या देशावर सुद्धा कोरोना या विषाणूंच्या प्रादुर्भावाने मोठे संकट आजरोजी निर्माण झाले असून संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन सुरू आहे. अशा कठीण प्रसंगी शासन, प्रशासन आपल्या परीने सर्वतोपरी मदत जनतेपर्यंत पोचविण्याचे कार्य करीत आहे.

त्यातच देशावर आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी दानशूरांना मदतीचे आवाहन करण्यात आल्यानंतर अनेकांकडून आपापल्या परीने मदतीचा ओघ सुरू आहे. अनेकांकडून आपण केलेल्या मदतीची कोठे वाच्यताही न करता आपले कर्तव्य समजून जमेल ते करण्याचा प्रयत्न करून मोकळे होत आहेत. मात्र अशाच या मदतीमध्ये काहींकडून मात्र केलेल्या मदतीचा गाजावाजा करीत धन्यता मानीत असल्याचेही प्रकार शहरात समोर येत आहेत. त्यामुळे देशावर ओढवलेले संकट व आपण या देशाचे एक नागरिक असल्याने आपलीही अशा संकटप्रसंगी जबाबदारी असल्याचे भान विसरीत असलेल्या या प्रकारामुळे कोरोनाच्या या लढ्यात लढतांना जणूकाही प्रसिद्धीचा काहींकडून खेळ मांडीलाफ असल्याचेच म्हणावे लागेल.

प्रत्येकवेळी गावपातळीवर म्हणा की शहरांमध्ये म्हणा असे प्रसंग असो वा कुठलाही कार्यक्रम अशावेळी आपण किती दानशूर आहोत हे दाखविण्यासाठी धडपडणारे पुढारी आपणाला प्रत्येकवेळी दिसतातच अन् या कोरोना विषाणूंच्या युध्दावेळी त्यांनी त्यांच्या तशा कार्याचे दर्शन घडविलेच, यात काहींनीतर हद्दच केली चार पाच पोळ्या, लहानशा डब्यात भाजी, ५-२५ कप चहा, बोटावर मोजता येतील एवढे मास्क वाटप करून वाटप केलेल्या साहित्याच्या कितीतरीपट अधिकप्रमाणात फोटो काढून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करीत आपली धन्यता करवून घेतली. त्यातल्या तर काहींकडून काही निवडक स्वस्त धान्य दुकानात आपल्या मर्जीतील व्यक्तींना मोफत धान्य वाटप करण्याच्या बढाया मारीत असल्याचेही प्रकार समोर येत आहेत.

नेत्यांचे कार्य जागृत असणे गरजेचे

कोणतेही संकट असो अशावेळी जनतेप्रती नेत्यांचे कार्य हे तेवढेच जागृत असणे गरजेचे असते. त्यांच्याकडून ते केलेही जात असेल मात्र ते करीत असताना त्यांचाही प्रसिद्धीचा मोह त्यांना आवरता येत नाही. या कोरोना विषाणूंच्या लढाईत हेच प्रकर्षाने बघावयास मिळाले अन् आमदारापासून ते नगरसेवकापर्यंत राजकीय नेत्यांनी केवळ आपण करीत असलेल्या कार्याची प्रसारमाध्यमांमधून वाहवाह मिळविण्यातच धन्यता मानण्यावर भर दिल्याचे वास्तव प्रकर्षाने समोर आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध