Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ मे, २०२०
कोरोना लॉकडाऊन आणि भूमिहीन मजूर लोकांची व्यथा
आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे.भारतातील ६० टक्के लोकांचा उदरनिर्वाह हा शेती संबंधीत व्यवसायावर अवलंबून आहे.काही वर्षांपासून महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडयात भयंकर दुष्काळ होता.सतत नापिकीला कंटाळून महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात शेतक-यांनी आत्महत्या केल्या.हा आकडा गेल्या १४ वर्षातील सर्वोच्च आकडा आहे.शेतक-यांच्या या आत्महत्येचा प्रश्न सतत चर्चिला जातो.मात्र ही चर्चा एकांगी आहे असे मला वाटते.शेतीवर फक्त शेतक-यांचेच पोट
अवलंबून आहे असे नाही तर असा एक वर्ग आहे ज्याचा विचार कुठेच केला जात नाही.
ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच शेतीचीही एक दुसरी बाजू आहे ती बाजू म्हणजे शेतमजुर.हा वर्ग या काळात कसा जगला? या शेतमजुर वर्गापैकी किती लोकांनी आत्महत्या केल्या याचा कुठेच उल्लेख केलेला आढळत नाही. शेतमजुर हा असा वर्ग आहे जो कायम दुर्लक्षीत आहे.
जिथे शेतक-यांचीच ही दयनीय अवस्था आहे तिथे आपले रोजचे पोट फक्त आणि फक्त शेतीत मजुरी करून मिळणा-या पैशावरच अवलंबून आहे तो शेतमजुर वर्ग सध्या कोणत्या अवस्थेत आहे याचाही विचार व्हायला हवा.ग्रामिण भागातील हा फार मोठया प्रमाणावर असलेला वर्ग असंघटीत राहिला आहे.भारतात फार पूर्वीच्या काळापासून शेतमजुरांना त्यांच्या हकांपासून दूर ठेवण्यात आल आणि वेठबिगारी करण्यासाठी भाग पाडण्यात आल त्यामुळे यांच्या पिढयान पिढया शेतमजुरी करण्यासाठी तयार झाल्या.भारताला स्वातंत्र्य मिळून ७०वर्ष झाल्यानंतर या वर्गाच्या स्थितीत थोडीफार सुधारणा झाली आहे मात्र आज ही हा वर्ग असंघटीत असल्याने यांच्या जीवनमानात सुधारणा झालेली नाही.यांच्या रोजगारात अपेक्षीत वाढ न झाल्याने या वर्गात दारिद्रय कायम आहे. मंग असा हा वर्ग हळूहळू खेड्याकडून शहराकडे वळू लागला शहरात आल्यानंतर प्रश्न निर्माण झाला रोजगाराचा हा निर्माण झालेला प्रश्न सोडवण्यासाठी मिळेल ते काम करून मिळेल त्या वेतनावर मिळेल त्या ठिकाणी राहू लागला व आपल्या पोटाची खळगी भरू लागला. सकाळी अगदी पहाट पासून रात्री उशिरापर्यंत काम करू लागला, परंतू हेच काम रोज असेल,दोन वेळ पोटाला घासभर खायला मिळेल का नाही यांची देखील शाश्वती नव्हती.अगदी भंगार गोळा करणे,हमाली करणे,लोकांची धुणी-भांडी करू लागला यातून शिळे पाके मिळत असे.राहण्यासाठी घर ना दार रस्त्याच्या कडेवर , मोकळ्या जागेवर, फुटपाथवर, उडान पुलाच्या खाली,नदी-ओढ्याच्या कडेला,रेल्वे स्टेशन-बस स्टँडच्या परिसरात जागा मिळेल तेथे पाल मारून राहू लागला.मागासलेपण हा या कुटुंबाचा पटकन लक्षात येणारा भाग आहे.घरात कोणी आजारी असेल तर पटकन औषध आणत नाहीत,परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली तर औषधपाण्याचा खर्च नको जर यंदा कदाचित अड्मेट केलेस तर डॉक्टरला देयचे काय आणि खायचे काय,शिवाय मिळालेले काम जाते की काय ही वाटणारी मोठी भीती,यावर उपाय म्हणून हे लोक मांत्रिक,तांत्रिक,साधू याच्याकडे धाव घेऊ लागले,कळतं नकळत अंधश्रध्दाच्या मागे लागले.याला मुख्य कारण होते अशिक्षितपणा,रोजगार बुडला तर खायचं काय ?
आई बाप दिवसरात्र काबाडकष्ट करून मुलाबाळांच्या तोंडी चार घास घालतात.त्यापैकी बहुतेक सर्व अन्न हे आत बसलेले शोषक(जंत)फस्त करीत असतात.पोटाची खळगि भरण्यासाठी हे लोक खाऊन माजलेल्या लोकांनी कचराकुंडीत,रस्त्यावर टाकलेले शिळे, उष्टे,नसलेले,सडलेले अन्न खतात व एक वेळच्या पोटाची सोय करून वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत असतात. मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही यातून ही मंडळे वाम मार्गाला लागते.चोरी मारी करू लागते.व्यसनी बनते सरसपणे लहान लहान मुले देखील
गुटखा,मावा,तंबाखू,बिडी,सिगरेट यांच्या आहारी गेलेली दिसतात.जवळजवळ ७०ते ८० टक्के मजुर लोकांना दारूचे व्यसन लागते,यातूनच दारूचा खर्च वाढल्यामुळे कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत, खायचे वांदे होते.तर आरोग्याचा प्रश्न वेगळाच.
मला प्रश्न पडतो जेथे एवढी असुरक्षितता आहे, घाण आहे, रोगराई आहे, तिथे लोक का राहतात ? कचऱ्यात पडलेले खाण्याची वाईट वेळ का येते? दुसरीकडे राहण्याचे स्थान नाही म्हणून राहतात, गावाकडे उपाशी मरायचं का इथे येऊन रहायचे येवढाच प्रश्न समोर असतो.यांना घाणीत राहण्याची काय हौस नसते.नरकात राहूनदेखील जीवन जगता येते येवढाच या नरकाचा फायदा यांना असतो.कचऱ्याने भरलेल्या वातावरणात ही मुले काय मंगल्य शिकणार,काय पावित्र्य जपणार.झोपडपट्टीतल्या वस्तीत जमेल तसे,जमेल तिथे एकमेकांपासून हवे ते ओरबाडून घेणे हाच काही मंडळींचा कायदा असतो.
झोपडपट्टी हा माणसाची जनावरे बनवण्याचा एक मोठा कारखाना आहे.वास्तविक ज्यांच्यासाठी कायदे आहेत, त्याच्यापेक्षा कायदेशीरदृष्ट्या जे असुरक्षित आहेत,त्यांच्या युनियन आधि बांधल्या पाहिजेत, आणि चळवळ करून त्यांना कायदे लागू करून घेतले पाहिजेत पण तेवढे मोठे आवाहन कोण घेणार ?
ज्यांच्या शरीरातील सर्व शीरा आखाडल्या आहेत, ज्याना अतिशय अपुरी मजुरी मिळते , जे गलिच्छवस्त्यमध्ये राहतात, जनावरांचे जिने जगतात ते मजुर आज दोन महिने होत आली संपूर्ण देश कोरोना या संसर्गजन्य महामारीमुळे लॉक डाऊन आहे. मंग प्रश्न निर्माण होतो या लोकांचा,ज्याना घरच नाही, भीक मागून जगणारे अनाथ, भिक्षा मागून उपजीविका भागवनारे भिक्षेकरी , कामगार मजुर यांनी करायच काय देशात असे कित्येक लोक आहेत की ज्याना अद्याप रेशनकार्ड नाही अशांना शासन तरी काय अनं कशी मदत करणार आणि जरी यंदा कदाचित केली तरी मूठभर धान्येपुरणार कसे आणि तेवढ्याने भागत नाहीच प्रश्न निर्माण होतो मीठ मिरचीचा त्याचं करायचं काय,अनेक सामजिक संघटना, समाजसेवक पुढे आले मदतीचा हात समोर केला मला अभिमान वाटला,परंतू मदत कमी आणि जाहिरातबाजी जास्त होऊ लागली म्हणजे गरज आहे म्हणून मदत करतोय की जाहिरात करण्याची,स्टंटबाजी करण्याची संधी मिळाली म्हणून मदत करतात आणि सोशल मिडीयाद्वारे चार-चार वेळा हेच फोटो व्हायरल करतात, भूकेच्य वेदनापेक्षा या वेदना नक्कीच मदत घेणाराच्या मनात आल्याशिवाय राहिल्या नसतील यात तीळमात्र शंका नाही.
कोरोना नावाचं संकट आल्यापासून सगळीकडे प्रमुख रस्त्यांवरुन मजुरांचे थवेच्या थवे पायपीट करताना दिसत आहेत. हे चित्र देशभरात पाहायला मिळतंय. खरं तर हजारो मैल दूर असलेल्या आपल्या घरी कधी पोहोचू, हे त्यांनाही माहिती नसेल. गावात गेल्यावर आपल्याच गावांत, घरांत प्रवेश मिळेलच याचीही शाश्वती नाही. तरीही मजल दर मजल सुरुच आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. लेकरांबाळांचं पोट भरण्यासाठी आधार असलेला शेतीमाल जागेवर मातीमोल होतायत. शेतकरी असो नाही तर शेतमजूर, कष्टकरी, कामगार, संघर्षातून जगण्यासाठी धडपडणारी माणसं हतबल झालीत. कारण नेहमीप्रमाणे संकटाने पहिला घाव यालोकांवरच घातलाय.कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने एखाद्या वाहनाचा अपवाद सोडला तर सुनसान रस्ता. भर दुपार, सूर्य माथ्यावर आलेला. अशा कडकडत्या उन्हात डोक्यावर पिशवी घेऊन चालणारे मजुरांचे घोळके दिसतात, लाॅकडाऊन झाल्यानं काम बंद झालं. जगायचं अवघड झालं होतं. पहिले पंधरा दिवस काढले कसं तरी, आता हाताला काम नाही. खायचं काय? वरुन काही अडचणी आल्या तर कोण मदत करणार, ज्यांनी कामासाठी आणले होते, त्यांनी तर कधीच वाऱ्यावर सोडले. लाॅकडाऊन कधी उघडणार, कामं कधी सुरु होणार माहिती नाही. म्हणून आता इथं राहून काही उपयोग नाही. त्यापेक्षा घर जवळ केलेलं बरं असं वाटू लागलं. वाहनं बंद असल्याने जायचाही मार्ग खुटंला. मात्र इथं अडकून पडण्यापेक्षा पायी जाऊन घर गाठू असा निश्चय करुन काही लोक पाच दिवसापासून चालत आहेत. दोन किलोमीटरचं आंतर पार केलंय. कधी पोचू माहित नाही, मात्र चालणं सुरुच ठेवू. लेकरं कटाळलीत, पण काय करणार, परिस्थिती अशी वाईट झालीय की एखादे मोकळे वाहन चालले तरी उभे करत नाहीत.(माणुसकी धर्म दाखवून कोण कारवाई करून घेईल) खायला कधी मिळते, कधी उपाशी दिवस काढावा लागतो. लेकराकडे पाहून जीव तुटतो. माणसं मदत करायची इच्छा असूनही जवळ येत नाही. अनेक ठिकाणी जेवायला देतात.
अशी कितीतरी उदाहरणं गेल्या महिनाभरात पहायला मिळाली आहेत. मराठवाडा, विदर्भातील मागास भागातले लोक पोटासाठी मुंबई, ठाणे, पुणे गाठलेय. त्यातले बहूतांश शेतकरी आहेत. संकटकाळी आपला गाव बरा असंच म्हटलं जातं. आता रस्ते बंद. गावाकडे डोंगरातील अवघड रस्ता पार करत आहेत, प्राणी देखील अश्या रस्त्याने सहज जात नाहीत. त्या रस्त्यावरून बाया-माणसे, मुले आली. डोंगरातल्या गावांत आल्यावर त्यांचा मागणी एकच होती- भाऊ, उपाशी आहोत. काही नको, भाकरी द्या...ऊसतोडणीचा हंगाम संपला आणि घरी जायचं तर लाॅकडाऊन झालं. मजूर कारखान्यावर अडकून पडले. एरवी मजूर ऊसतोडणीचा हंगाम संपून एप्रिल-मे मध्ये गावी जाऊन शेती मशागतीची कामं करतात.असे आलेले मजुर कामगार कॉरटाईन करून ठेवले जात आहेत.
काही दिवस तर दूध संकलनच झालं नाही. एवढ्या मोठ्या दुधाचं करायचं काय, असा प्रश्न . शेतात कलिंगड, खरबुज, वांगी , शेवगा लावलेले आमचे चिंचपूर(बु) व परिसरातील शेतकरी. गहू,हरभरा पेरलेला. मिरची, कलिंगड, खरबूज, टोमॅटो, वांगी,केळी,द्राक्षे विकायचे दिवस आले आणि अचानक लॉकडाऊन झालं. सोन्यासारखा माल कवडीमोल भावानं विकावा लागला. त्यात चार दिवस झालेल्या अवकाळी पाऊसामुळे मोठे नुकसान झाले.
उन्हाळ्यात फळे, भाजीपाला, दुधाला चांगली मागणी असते. मोठ्या आशेने लागवड केली. नेमक्या विकायच्या वेळेला कोरोनाने घात केला. वासराच्या आणि लेकरांच्या तोंडातून काढलेल्या दुधाची नासाडी झाली.
अनेक तरुण शेतकऱ्यांनी रोजगार नाही म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन सुरु केलं. त्यातून कुटुंब सावरण्यासाठी मदत होतेय. कोरोना आला आणि अफवेतून कुक्कुटपालन संकटात आलं. शेकडो कोटीचं नुकसान झालं. पोटावरच मारलं ना आपत्तीने. शेतकऱ्याची भाकरीच हिरावून घेतली गेली. जूनमध्ये खरीपाची पेरणी सुरु होते. यंदा अनेक ऊसतोड मजूर कारखान्यावरच अडकून पडले. आता कुठे घर गाठता आलं. पण गावशिवाच्या बाहेरच चौदा दिवस मुक्काम ठोकावा लागलाय. शेतीची कामं अडकलीत. त्याचा परिणाम खरीपावर होणार आहे. ऊसतोडणी कामगारांची भाकरीही यंदा तुटणार आहे. ठिक-ठिकाणी माणुसकीचं दर्शन घडतंय. हातावर पोट असलेल्या लोकांची भुक भागवण्यासाठी जेवणाची व्यवस्था केली जातेय. त्यातून संकटांच्या काळात भूक भागवली जातेय. कोरोनासारख्या गंभीर संकटानं सारं जग अडचणीत आणलंय, पण सर्वाधिक आपत्ती आलीय ती हातावर पोट असलेल्यांवर. मजूर, शेतकरी, कामगार, कष्टकरी सारेच हतबल झालेत.
आतापर्यतच्या इतिहासात अनेक संकटं आली. त्याला आमची माणसं पुरून उरली. राबणारी माणसं पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली. मात्र दुष्काळ असो की अवकाळी, नाही तर अन्य कोणतीही आपत्ती, त्याचा पहिला घाव शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर आणि जगण्यासाठी लढणाऱ्यांनाच सहन करावा लागतो. कोरोनाचं संकटही त्याला अपवाद नाही.
अशा कष्टकरी भूमीहीन मजुरांच्या काय व्यथा आहेत,दुःख आहेत हे समजण्यासाठी अनिल अवचट यांचे माणसं ! हे पुस्तक अवश्य वाचा (मला ते पुस्तक उपलब्ध करून देणारे गुरुवर्य शेख सर याचे आभार मानतो) यातून लक्षात येईल.थोडक्यात कामगारांचे प्रश्न सोडवणे ही आपली सर्व समाज घटकांनी जबाबदारी मानली पाहिजे.आणि मुख्य म्हणजे यासर्व सुधारणा भाववाढ नकरता अमलात आल्या पाहिजेत.यांना हक्काचे घर,निवारा, काम मिळावे हीच माफक अपेक्षा.अरे माणसा तू माणूस बन.
घरी रहा, सुरक्षीत रहा.आपली व आपल्या परीवाची काळजी घ्या.
राहूल शिंदे .
(सहशिक्षक,सनराईज स्कूल शेळगांव, ता.परंडा, जि.उस्मानाबाद)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

भूमीहीन मजूरांच्या वेदना आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल धन्यवाद।।।डोळ्यात अजंन घालणारा लेख आहे
उत्तर द्याहटवा