Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० जुलै, २०२०

खरीप हंगामातील पिकांसाठी..! पाणी अर्ज सादर करावेत..!


धुळे, दि. 9:खरीप हंगाम 2020-2021 मध्ये भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमूग व इतर हंगामी पिके इत्यासाठी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार बागायतदारांनी आपले नमुना क्रमांक 7, 7 (अ), (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय अभियंता, लघुपाटबंधारे बांधकाम उपविभाग, शिरपूर या कार्यालयात 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत सादर करावेत, असे कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, धुळे यांनी म्हटले आहे, त्यांच्या अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, उपसा सिंचन योजना, अधिसूचित नदी, ज्या ठिकाणी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा प्रकल्पावरील पाण्याचा लाभ घेणाऱ्या बागायतदारांनी 1 जुलै 2020 ते 14 ऑक्टोबर 2020 या कालावधीकरीता 1 जुलै 2020 पासून सुरू झालेला खरीप  हंगाम 2020- 2021 मध्ये भुसार/ अन्नधान्ये/ चारा/ डाळी /कपाशी/ भुईमूग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरविले आहे.

बागायतदार शेतकऱ्यांनी  आपले नमुना क्रमांक 7, 7 (अ), (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31 ऑगस्ट 2020 पर्यंत देण्याचे करावे. पाणी अर्ज स्वीकारण्याच्या शर्ती पुढील प्रमाणे : पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदारांनी आपापल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी/ ना मंजुरीचा विचार करण्यात येईल. 

मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये/ भुसार/ चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेवू नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळी नसताना पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणाऱ्या बागायतदारांचे नियमानुसार पंचनामे करण्यात येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.

टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. विहित दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देवून पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यांची जाहीर प्रकटनाद्वारे प्रसिध्दी करण्यात येईल. लाभ क्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिन अर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल, असेही कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, धुळे यांनी म्हटले आहे.


(२)जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना..!
पीक विमा योजनेत सामावून घ्यावे..!
जिल्हाधिकारी संजय यादव यांचे निर्देश..!

धुळे, दि. 9:प्रधानमंत्री पीक विमा योजनेत धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना सामावून घ्यावे. या योजनेची गावपातळीवर व्यापक प्रमाणात जनजागृती करून शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पीक विमा सनियंत्रण समितीची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाने, शेतकरी प्रतिनिधी ॲङ प्रकाश पाटीलयांच्यासह कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, खरीप हंगामातील विविध पिकांसाठी पीक विमा योजना लागू झाली आहे. कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून या योजनेची गावागावांत जनजागृती करावी. काही वेळेस नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांना फटका बसतो. पर्यायाने शेतकऱ्यांचेही नुकसान होते. आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून मदत मिळू शकते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पिकांचे नुकसान झाल्यास तत्काळ पिकांचा पंचनामा करून घ्यावा. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करावे. तसेच विमा योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत आपापले संपर्क क्रमांक सुरू राहतील याची खबरदारी बाळगावी. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी प्रास्ताविक करून पीक विमा योजनेची सविस्तर माहिती दिली.


(३)रोजगार मेळाव्यानिमित्त..! मंगळवारी ऑनलाइन समुपदेशन..!

धुळे, दि. 9: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे यांच्यातर्फे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त 15 व 16 जुलै 2020 रोजी ऑनलाइन पध्दतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यानिमित्त 14 जुलै 2020 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या कालावधीत ऑनलाइन समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी कळविले आहे.

धुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी हा ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील मुलाखती व्हीडिओ कॉन्फरन्स (Skype, Whatsapp, Zoom, Etc शक्यता Google Meet) तसेच मोबाईल दूरध्वनीद्वारे घेण्याचे नियोजन आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी 14 जुलै 2020 रोजी ऑनलाइन समुपदेशन सत्र होईल. त्यात केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसचे समन्वयक डॉ. अनिल जाधव हे ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट- तयारी कोरोनानंतरच्या रोजगार संधीची’ याविषयावर समुपदेशन करतील. सदरचे सत्र हे गुगल मीट या ॲपद्वारे होईल. त्याची लिंक https://meet.google.com/qbg-goye-zxi अशी आहे.

या ऑनलाइन सत्रात सहभागी होताना उमेदवारांनी वरील लिंकवर क्लीक करावे. गुगल मीट ॲप इन्स्टॉल करून घ्यावे. कनेक्ट झाल्यानंतर Ask to Join वर क्लीक करावे. सत्रात सहभागी होण्यासाठी नियोजित वेळेच्या दहा मिनिटे आधी जॉइन व्हावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर आपला व्हीडिओ व माइक बंद/म्यूट करावा, असेही सहाय्यक आयुक्त डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध