Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

53गावांचा एकच सार्वजनिक गणपती,भूम पोलिसांचा अभिनव उपक्रम...!


भूम(राहूल शिंदे)दि.२3 कोविड-19 संसर्गजन्य रोगामुळे सार्वजनिक उत्सवावर मर्यादा आलेल्या आहेत.केंद्रसरकार व राज्यसरकारने देखील सण-उत्सव अगदी साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. 

त्यानुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खेडेगावात ‘एक गाव, एक गणपती’तर शहरात  'एक वार्ड, एक गणपती' ही संकल्पना राबवण्याचा निर्णय मा.पोलीस अधिक्षक श्री.राज तिलक रौशन यांनी घेतला. त्याला प्रतिसाद देत भूम तालुक्यात एक गाव एक गणपती,नव्हे तर ‘एक तालुका,एक गणपती’ हा अभिनव उपक्रम भूम पोलिसांनी राबविला आहे.
   
उस्मानाबाद जिल्ह्यासह भूम तालुक्यामध्ये सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत चाललेला आहे. सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये गर्दी होऊन कोरोनाआजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याची दाट शक्यता असून, त्याची झळ अनेकांना बसू शकते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन समाजाच्या सुरक्षिततेसाठी भूम तालुक्यातील  सर्व 53 गणेश मंडळ व ग्रामस्थांशी चर्चा करून,प्रबोधन करून त्यांनी उत्स्फूर्तपणे सहमती व सहकार्य दर्शविल्यामुळे संपूर्ण तालुक्याचा ‘एकच सार्वजनिक गणपती’ भूम पोलीस स्टेशन समोर काल दि.22 रोजी मा.पोलीस अधिक्षक साहेब यांच्या हस्ते बसवण्यात आला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवा दरम्यान कोरोना सारख्या आणीबाणीच्या स्थितीत तालुक्यांमध्ये गणेश मंडळाच्या सहकार्याने सामाजिक संदेश देणारे उपक्रम व शिबिरे राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप,अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप, सेनेटायझर-मास्क वाटप  स्वच्छता अभियान, परिसर निर्जंतुकीकरण इत्यादी अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

भूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व गणेश मंडळांशी चर्चा करून एक तालुका एक गणपती बसविण्याबाबत चर्चा केली. तालुक्यात शहरासह ५२ गावांचा समावेश असून सुमारे ५० हून अधिक लहान मोठी मंडळे आहेत.या उपक्रमाला सर्वानी एकमताने सहमती दर्शविली. त्यामुळे भूम पोलीस ठाण्याच्या समोर संपूर्ण तालुक्याचा 53 मंडळाचा मिळून एकच गणपती बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिला व एकमेव उपक्रम आहे. 

यावेळी,पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन, पोलीसउपअधिक्षक विशाल खांबे,भूम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ आणि तालुक्यातील सर्व गणेश मंडळे, नागरिक,पोलीस कर्मचारी कोविड-19च्या सर्व नियमांचे पालन करून उपस्थितीत होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध