Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

पदर..! आपली भारतीय संस्कृती..!


कुटुंब आणि सामाजिक पातळी यावर आठवतो तो सासुबाईंचा एक भरदार व्यक्ती म्हणून नेतृत्वाचा आदर आणि पदर।।
कुटुंबाची सेवा आणि कुटुंबाची शान म्हणजे कुटुंबाची सुनबाई... तिचा पदरही खुपच मोलाचा।।

सामाजिक बंधन निर्माण करतांना मुलीचा पदर हा वराच्या उपरण्यास जीवनातील महान कार्य म्हणून जेव्हा बांधला जातो तेव्हा तो पवित्र बंधनाचे अस्तित्व निर्माण करतो।।
⬇️
काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही, एक सरळ तीन अक्षरी फक्तशब्द पण केवढं विश्व सामावलेलं आहे त्यात, किती अर्थ, किती महत्व काय हा पदर? खरच...साडी नेसणाऱ्या स्रीच्या खांध्यावर रुळणारा मीटर, दीडमीटर लांबीचा भाग... तो स्रीच्या विचाराचं रक्षण तर करतोच, सगळयात महत्त्वाचं हे कामच त्याचं पण... आणखी ही बरीच कर्तव्य तो पार पाडत असतो. या पदराचा उपयोग स्री केंव्हा कसा अन् कशासाठी करेल ते सांगताच येत नाही. सौदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छानछान पदराची जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. लहान मुल आणि आईचा पदर हे अजब नातं आहे. 

मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन सुरक्षित असल्याची भावनाच व्यक्त करण्याचा प्रयत्न करतं. जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं की, त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा पदर पुढे करते. मूल अजून मोठं झालं, शाळेत जाऊ लागलं की, रस्त्यानं चालताना आईच्या पदराचाच आधार त्याला लागतो. एवढंच काय जेवण झाल्यावर हात धुतला की टाँवेल ऐवजी आईचा पदरच ते शोधतं आणि आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात कारण त्यातील तिचे ते प्रेम. मुलानं पदराला नाक जरी पुसलं तरी ती रागवत नाही त्याला बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला आईचा पदर सापडतो. महाराष्ट्रात तो डाव्या खांद्यावरुन मागे सोडला जातो तर गुजरात, मध्यप्रदेशात उजव्या खांद्यावरुन पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो. 

काही कुटूंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा झाकून घेतात. तर काही जणी आपला लटका राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात. 

सौभाग्यवतीची ओटी भरायची असेल तर ती पदरातच अन् संक्रातीचं वाण लुटायचं ते पण पदर लावूनच. बाहेर जाताना उन्हांची दाहकता थांबवण्यासाठी पदरच डोक्यावर ओढला जातो तर थंडीत अंगभर पदर लपटलेल्यावरच छान ऊब मिळते. काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच गाठ बांधली जाते अन् नव्या नवरीच्या जन्माची गाठ ही नवरीच्या पदराची नवरदेवाच्या उपरण्यासोबत बांधली जाते. पदर हा शब्द किती अर्थानी वापरला जातो ना..!! नवीनवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी लाडीकपणा करते पण संसाराचा राडा समोर दिसला की पदर कमरेला खोचून कामाला लागते. 

देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना हे, परमेश्वरा माझ्या चुका "पदरात"घे' मुलगी मोठी झाली की, आई तिला साडी नेसायला शिकवते पदर सावरायला शिकवते अन् काय म्हणते? अगं,चालतांना तू पडलीस तरी चालेल पण पदरालाखाली पडू देऊ नकोस... कारण ती आपली भारतीय संस्कृती आहे. अहो अशा सुसंस्कृत आणि सभ्य मुलींचा विनयभंग तर दुरच ती रस्त्यावरुन चालताना लोकं तिच्याकडे वर नजर करुन साधे पहाणारही नाहीत. 

ऊलटे तिला वाट देण्यासाठी बाजुला सरकतील एवढी ताकत अाहे त्या पदरात. फक्त पदर ही आपली भारतीय संस्कृती जपायला हवीच.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध