Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

कै.दादाराव मल्लाव समाजसेवेच्या पटलावरील एक हिरा काळाच्या पडद्याआड...!



पुणे प्रतिनिधी: राज्यातील समस्त मल्लावभोई समाजाच्या पटलावरील कोहिनूर हिरा, पुणे विभागातील मल्लावभोई समाजाचे अध्यक्ष स्वर्गीय दादाराव किसनराव मल्लाव यांचे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. स्वर्गीय दादाराव मल्लाव यांनी समाजविकासासाठी अनेक सामाजिक कार्य केले. 

मल्लाव भोईसमाजाची शासनदरबारी ओळख निर्माण करतांना अतोनात प्रयत्न करून समाजाची नोंद करून घेतली. मल्लावभोई समाजाच्या एकत्रीकरणासाठी अधिकृत सोसायटीचीही स्थापना केली तसेच समाजातील काही खंडित झालेले पारंपारिक उत्सव त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पुन्हा नवीन सुरुवात करून दिली. 

समाजाची एकजूट व समाजसंघटन करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करून गावोगावी जावून मल्लावभोई समाजाची शाखा उद्घाटनाचे काम त्यांनी केले तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली. युवापिढीची जनजागृती करण्यासाठी त्यांनी काही शालेय उपक्रम केले त्यामध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी गुणवंत सोहळ्याच्या माध्यमातून बक्षीस वाटप कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले. समाजातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात ते अग्रभागी होते. 

पूर्वीपासून समाजाला भेडसावणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे जातीच्या दाखल्याची कै दादाराव यांनी जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र समाजाला मिळविण्यासाठी आयोगाला वेळोवेळी पाठपुरावा केला व करत होते. मल्लावभोई समाजाला सरकार दरबारी सामाजिक, राजकीय आरक्षण मिळावे याकरिता महाराष्ट्रस्तरावर सामाजिक महामेळावे, संघटनेतुन प्रयत्न केले. दरवर्षी आषाढीवारी नंतर आळंदी ते पंढरपूर दिंडीचे आयोजन होते त्या दिंडीसाठी लागणाऱ्या समृद्धीसाठी समाजाचा एकत्रीकरणातून समाजातील ज्येष्ठ व्यक्ती पर्यंत पोहचवण्याचे कार्य मोठ्या कष्टाने पार पाडत होते. कोरोनाच्या संकट काळात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सदर काळामध्ये समाजातील गरजू विद्यार्थ्यांना, काही कुटुंबांना घरोघरी जाऊन अन्नधान्य वाटप केले व आर्थिक मदतही केली तसेच समाजातील संकटकाळी उद्भवलेल्या अतिप्रसंगावर सरकारदरबारी जाऊन न्याय मिळविण्याकरिता पाठपुरवठाही केला. 

मल्लावभोई समाजाचे लाडके, दानशूर, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व, युवा पिढीचे प्रेरणास्थान, उत्तम संघटक, कार्यशील कार्यसम्राट अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब किसनराव मल्लाव हे आमच्यातुन अचानक जाण्याने समाजात कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

निरपेक्षवादी समाजाचे नेतृत्व आज समाजात निर्माण होणे तरी कठीण होऊन बसले आहे. त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यातच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे तरी वाटते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध