Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

गुन्हेगारांचा कर्दनकाळ ... नवे बुलडाणाचे एसपी अरविंद चावरिया !



एसपी डॉ. दिलीप पाटील भूजबळांची यवतमाळला बदली

बुलडाणा प्रतिनिधी:अॅन्टी करप्शनच्या अनेक मोठ्या कारवाया करुन मोठे मासे गळाला लावणारे आणि अनेक गुन्हेगारासाठी कर्दनकाळ ठरून सराईतांना गजाआड करणारे भापोसे अरविंद चावरिया आता बुलडाणा जिल्ह्याच्या पोलिस दलाचा पोलिस अधिक्षक म्हनून कार्यभार सांभाळणार आहेत. 

गृहविभागाने राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे १७ सप्टेंबरला आदेश काढले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया आता बुलडाण्यात रुजू होणार असून कार्यकाल संपलेले डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची यवतमाळला बदली झाली आहे.

पुणे पोलिस आयुक्तलयाच्या मुख्यालयाची जवाबदारी उपआयुक्त म्हणून सांभाळणे असो की, पुण्याचे राज्य राखीव बल गट १ चे समादेशक पद अरविंद चावरिया यांनी लोकाभिमुखता जपली. त्यांनी पूर्वी हिंगोली पोलिस अधिक्षक म्हणून दीड वर्ष कार्यभार सांभाळला आहे. त्यांच्या कारकिर्दीत विविध गुन्ह्यातील आरोपींच्या त्यांनी मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे राज्य राखीव पोलिस दलातील भरती घोटाळ्यातील आरोपींची कसून शोध मोहीम करीत अनेकांना जेरबंद केले. दरम्यान अरविंद चावरिया यांची औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलिस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली. तेव्हा लाचखोरीतील मोठमोठे मासे त्यांच्या गळाला लागले.

औरंगाबाद परीमंडळात कामचुकार पोलिस कर्मचार्‍यांना कामाला लावण्यासाठी पोलिस उपआयुक्त म्हणून अरविंद चावरिया यांनी त्यांच्या परिमंडळातील 7 पोलिस ठाण्यांमध्ये 659 कर्मचारी व 55 अधिकार्‍यांसाठी 20 कलमी कार्यक्रम आखला होता. 

त्यानुसार बीट अंमलदार व कर्मचार्‍यांचा आठवडाभराच्या कामांचा अहवाल ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे सोपवला जात असे. चावरिया यांनी परिमंडळ-2 चे उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी हि संकल्पना राबविली होती. त्यानंतर विविध ठाण्यांमध्ये कामांचा आढावा घेतल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांच्या हद्दीतील सातपैकी बहुतांश ठाण्यांमध्ये काही कर्मचारी कामचुकारपणा करतात. लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कामचुकार कर्मचार्‍यांना जरब बसवण्यासाठी हा उपक्रम त्यांनी सुरू केला होता. पोलिसांना 30 प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. चावरिया यांनी तपास, अर्ज चौकशी, प्रतिबंधात्मक कारवाई, दारू-जुगाराचे छापे, रात्रगस्त, परेड, बंदोबस्त, नाकाबंदी, मोहल्ला व वॉर्ड बैठक, ज्येष्ठ नागरिक भेट, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, फरार आणि गुन्ह्यातील आरोपी तसेच विशेष कामगिरी असा 20 कलमी कार्यक्रमाचा तक्ता बनवला होता. त्यामूळे त्यांची कार्यशैली छाप सोडणारी राहिली असून ते आता बुलडाण्यात नवे एसपी म्हणून रुजू होणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध