Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

गुरुजी शाळा कव्हा भरणार...!



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत,आमच्या मराठवाड्यातील ग्रामीण मुलांच्या  काय भावना आहेत.ते त्यांच्याच शब्दात मांडल्या आहेत.आमचे मित्र युवराज देवकर यांनी.वास्तववादी लेख.

आज तीन चार महिनं झालं शाळा बंद हुन,अजून म्या शाळेचं त्वांड पण पाहिलं न्हाय,असं वाटतय शाळा आज सुरू व्हईल उद्या सुरू व्हईल पण आजचा दिवस उद्यावरच जातोया.शाळेचा दिवस तरी कधी उजाडल तुम्हीच सांगा बुआ.आपली शाळा समद्या तालुक्यात एक नंबर बनवली हुती  तुम्ही,तेंव्हा समद्या गावासमोर तहसील दार सायेबांनी तुमचा सत्कार केला व्हता,अजून आठवतंय मला मास्तर तवा तुम्ही रडला व्हता.माझी आई पण म्हनती तुझा पण एक ना एक दिवस सत्कार हुईल फक्त मास्तरांनी सांगितल्याल आयकत जा,पण मास्तर मी तर तुमचं समद आयकत होतो तरी बी तुम्ही शाळा बंद करून का बरं गेलात.मी टीव्ही ला पायल्यावर कळालं कसला करुना का बिरुना रोग आलाय, म्हणून आपली शाळा बंद ठिवली. पण मास्तर आपल्या गावात अजून काय बी आलं नाय, तरी बी आपली शाळा का बरं बंद?.खरं सांगू मास्तर बा मला रोज गुरामागं धाडतोय रोज मला रानात काम कराय लावतोय तुम्ही असता तर शाळेतच रोज आलो असतो पण शाळा पण बंद हाय.
     
तुम्ही शिकविलेलं  ते नवीन गाणं सारख आठवतंय, सारखच मनाव वाटतंय पण काय करू कुणाला म्हणून दाखवू आयकायलाच कुणी नाही.समदी म्हणत्यात शाळला सुट्टी हाय तुमची मज्जाय बुआ,पण कसली मज्जा आन कसली फज्जा इथं शाळशिवाय आम्हाला करमत  नाय.तुम्ही गोलामधी उभा करून त्याला बॉल फेकून मारायचा  शिकवलेला खेळ मला लै आवडतो बघा,पण इथं माझ्यासोबत खेळायला पण कुणी येत न्हाय,समदी म्हणत्यात करूना व्हईल.एकतर आमचं घर गावाच्या बाहिर हाय आन आई बी बाहेर खेळायला सोडत न्हाय. तुम्ही व्हता तवा शाळेत रोज खेळायला सोडत व्हता अन सगळ्यात मज्जा मंजि तुम्ही बी आमच्यासोबत खेळत व्हता. आमच्या शेजारच्या दाद्या कड बघायला टीव्ही हाय गेम खेळायला मोबाईल हाय,पण आमच्या घरी तर टीव्ही बी न्हाय आणि गेम खेळायला मोबाईल बी न्हाय, तवा मला तुम्ही वर्गात शिकीवलेला तानाजीचा पोवाडा आठवतो आणि एकटाच घरात परात बडवत म्हणत असतो बघा, दुपारच्या सुट्टीत वरण-भात खातानी केलेली मस्ती हे समद आता आठवायला लागलय.आई मंती घरात गपचिप बसून राय नायतर शेतात चाल
 कामाला,एकतर घरात एकटच बसवत न्हाय आन शेतात बा बसू देत न्हाय,काय करायचं काहीच कळत न्हाय.शाळेत खाल्लेल्या खिचडी ची चव आज मला घरी घावत न्हाय.शाळत शिकवीलेली गणितं सुद्धा आता आठवत न्हाईत,घरात इंग्रजी शिकवायला बी कुणी न्हाय.आई-बा दोघबी शिकलेली न्हाईत.आपुन शाळच्या भीतीवर रंगवलेली चित्र सारखी डोळ्यापुढं खेळत असत्यात, त्यांच्यासोबत बोलाय पण तुमी शिकविल व्हत.आणखी एक मास्तर आपुन लावलेली समदी झाडं जाळून गेल्यात त्यांना पाणी घालायला बी कुणी उरलं न्हाय. तुम्ही तेवडी गेटा ची चावी तरी देऊन जा राव  मी घालतो पाणी त्यासनी.नाहीतर अस करा मास्तर तुम्हीच मोठ्या सायबाला पत्र लिव्हून आपली शाळा चालू करा की,समदी वाट बघत्यात तुमची. त्या करुना वर औषध जवा यायचंय तवा येईल पण तुम्ही या मास्तर......शाळा चालू करा ना मास्तर..!

लेखक:- युवराज देवकर 

संकलन:- राहुल शिंदे,तरुण गर्जना विभागीय संपादक, उस्मानाबाद (9975114800)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध