Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०
मिराई या जन्मीचे ऋण फेडलेस.......!
हि कहाणी एका अजाणत्या कथानकेची. खरं तर व्यवसायाने अंगणवाडी मदतनीस असणार्या नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा धडगाव तालुक्यातील मिरा विरम परमार या माऊलीच्या अथक जीवनसंघर्षाची.....
२६आॅगस्टला नियतीने मृत्यूशी लढणाऱ्या तुझ्या देहाला कायमचा विसावा देत अनंतात विलीन केलेस.
लहानपणापासूनच नियतीने या माऊलीला दुःखाशी लढायला शिकविले.घरात म्हातारा बाप,दोन मोठ्या अपंग बहिणी अन् संसाराचा गाडा हाकणारी आई.हा सगळा संघर्षमय जीवनरथ हाकत असतांना आई अर्ध्यावर सोडून गेली.घरात सगळ्यात लहान असणारी मिरा खऱ्या अर्थाने मिराई झाली. खेळण्या कुदण्याच्या वयात घराची जबाबदारीआली. संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी बाबांनी लग्न केले.घरात भोळीभाबळी आई आली.
आता मिराईला सासरी जावे लागणार होते.लग्न झाले.माहेरी आई-बाबांच्या संघर्षमय संसारात वर्षानुवर्षानंतर आनंदाचा क्षण आला.मिराईला भाऊ झाला.आजपर्यंत एकटी समजणारी मिराईच्या आयुष्याचा पाठीराखा आला होता.मिराईचा आनंद गगनात मावेनासा झाला.आता मिराई आपल्या संसाराचा गाडा हाकलत होती.
तिच्या पोटी तीन रत्नांनी जन्म घेतला. निकेश,विशाल,अमित.अशातच मिराईच्या या सुखी संसाराला ग्रहण लागले.पती अर्ध्यावर सोडून गेला.मिराईला तरूणवयात जगाशी लढावे लागणार होते. नियतीने या माऊलीची आई लहानपणीच हिरावून घेतली.
तरूणवयात पती तीन मुलांची जबाबदारी सोपवून,तोही सोडून गेला.....माहेरी म्हातारा बाप,अपंग बहिणी अन् जगाची कसलीही रीत माहिती नसलेला भाऊ. हि सारी अस्मानी संकटं झेलत या मदर इंडियाने आपल्या तिन्ही मुलांना स्वाभिमानाने मोठे केलेत.जबाबदारीचे ओझे झेलणाऱ्या या माऊलीला म्हातारा बापही सोडून गेला.
घरट्यात आपली उपाशी पोरं अन् माहेरी भोळीबाभळी सावत्र आई, लहान भाऊ, अपंग बहिण. हे सारे दुःखाचे ओझे झेलत झेलत सुखी समाधानी आयुष्य उभे केले.वर्षामागुन वर्षे उलटत गेली.भावाचे लग्न झाले. माहेरची माणसं सुखी संसार जगू लागली.
मिराई आपल्या तिन्ही मुलांना आयुष्याची रीत शिकवत होती. स्वाभिमानाने जगतांना स्वतः कष्ट घ्यावे, कधीही कोणाकडे हात पसरवू नये.अशी शिकवण देत असे. अंगणवाडी मदतनीस असणारी मिरा खऱ्या अर्थाने अंगणवाडीमधील सर्व बालकांची माऊलीच होती.
लहानपणी माझ्या सारख्या लहान भावंडांना शाळेची ओढ लावणारी मिराई आता घराघरातील बालमनावर संस्कार करू लागली.मिराईचा लहान मुलगा अमित त्याचेच फळ.अमित नवोदय विद्यालयात शिकत आहे. घरसंसारात रममाण झालेली मिराई आता घरात सून आणायला उतावीळ झाली. लग्नाच्या बारीक सारीक तयारीला लागली.जसजसे लग्नाचे दिवस जवळ येत होते,तसतशी धावपळ वाढत होती.घरात कोणी मोठे व्यक्ती नाही,म्हणून जवळच्या नातेवाईकांना स्वतःनिरोप द्यायला जात होती.आता ८ दिवसावर लग्न येवून ठेपले.
पत्रिका वाटणे चालू होते.
जवळपास सर्व नातेवाईकांना निरोप पोहचविला गेला.अन् त्याचवेळी नियतीने डाव मांडला.देशभरात लाॅकडाऊन घोषित झाले.आता हि माऊली हादरली.लग्नकार्य पुढे ढकलले गेले.महिन्या मागून महिने उलटले.अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणारी मिराई घर ते अंगणवाडी. फारच झाले तर आपल्या माहेरच्या घरी (गावातच असणार्या घरी) जात असे.काही दिवसांपूर्वी सर्दी खोकला आला,अन् भीतीने घाबरलीच. मला कोरोना तर नसेल झाला ना. मनात असंख्य प्रश्नांनी घर केले.
माझे काही बरेवाईट झालेच तर...छाती नुसत्या काळजीने धडधडत होती.इकडे भितीपोटी आयुर्वेदिक उपचार सुरू झाला. पण कफ मात्र कमी होई ना. स्थानिक डॉक्टरांना दाखविले थोडेफार बरे वाटले.पण,मनात घर करून बसलेली भिती मात्र अस्वस्थ करत होती.रात्री स्वप्न पडू लागलेत...मला कोरोना तर नसेल ना. मुलं समजवू लागलेत. अगं आई, मागच्या वर्षीही खोकला होता,किती दिवस राहिला,तेव्हा कुठं होता कोरोना ? मिराईला मागच्या वर्षी थोडा हृदयाचा त्रास जाणवला होता.त्यावर उपचार केला होता. आता परत तोही त्रास असू शकतो.
पण भिती फक्त कोरोनाची.मनातली भिती काही केल्या जात नव्हती. छाती धडधडू लागली.शहादा येथे MD डाॅक्टरांना दाखविले. फिजिकल डिस्टंसिंग मुळे डॉक्टरांनी लांबूनच तपासणी करून औषध दिले.खरंतर एक्स रे काढणे गरजेचे होते.पण तसे झाले नाही.
औषधे लिहून दिले. मिळालेल्या उपचारासह घरी परतले.२-३ दिवस झाले.जेवण सुटले.मनातील शंका वाढू लागली.
जेवणाअभावी अशक्तपणा वाढला.आता छातीतील असह्य जीवघेण्या वेदनाही वाढू लागल्या. ग्रामीण रुग्णालयाची धाव घेतली. Blood oxygen saturation level चेक केले...अन् धोक्याची घंटा वाजली.९०-९५ लेवल पाहीजे. पण इथे ४०-५० होती. तात्काळ नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल च्या दिशेने धाव घेतली.आज पावसामुळे चांदसैली घाटात दरड कोसळल्याने तळोदा रस्ता बंद झाला.शहादा मार्गे निघालोत. शहाद्यात खाजगी रुग्णालयात दाखवून पाहीले.पण गंभीर परिस्थितीमुळे सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथेच यावे लागले.शेवटी जे नको होते,तेच झाले.....
कोरोना वार्ड मध्ये अॅडमिट केले.मिराईला खऱ्या उपचाराची गरज होती,ते निदान झालेच नाही.माऊली फोन करून सांगू लागली. मला छातीत असह्य वेदना होत आहे.मला काहीही करून इथून बाहेर काढा.
पण,अजून कोरोना टेस्ट चा रिपोर्ट यायचा होता.२ दिवस मृत्यूशी लढणारी मिराई.शेवटी हारली. एका ऐतिहासिक पर्वाचा अस्त झाला.आता पुढची लढाई सुरू झाली.कोरोना टेस्ट positive आहे का negative. Negative test आल्यास प्रेत ताब्यात देणार.Positive आल्यास, शासनाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात येईल. नियतीने एकदा परत डाव चुकविला. प्रथम rapid test, negative असल्याचे समजले. पण swab test ने डाव पलटविला. test positive आली. ज्या माऊलीने मोठ्या कष्टाने घरसंसार उभे केले. स्वतःच्या बळावर निर्माण केलेल्या घरी शेवटी जावू शकणार नव्हती. "देवा,एवढा निष्ठूर कसा झालास रे."आयुष्यभर दुःख झेलणाऱ्या माऊलीचा अंतही असा करावा. खरं तर मिराई आम्हाला आता कायमची सोडून गेली. अवघ्या४०-४२ वयातच. अजून खुप सारे जगायचे होते. खरं तर तिला लिहायला आवडत असे, हे तिच्या आत्ता सापडलेल्या वह्यावरून समजले. मिराई भरपूर काही शिकवून गेली. मुलांच्या अंगभूत गुणांनुसार वेगवेगळे मार्गदर्शन केले. खरं तर लहानपणी आलेली जबाबदारी तिच्या भवितव्यावर परिणाम करून गेली.अर्धवट शिक्षणाअभावी.... नाहीतर उत्तम शिक्षिकाच झाली असती. मिराई,तुझ्यात अनेक रूप पाहायला मिळाले. जिव्हाभावाची बहिण,आई,मित्र,उत्तम गुरू,मार्गदर्शक,संघर्षातही स्वाभिमानाने लढणारी मदर इंडिया,असंख्य दुखी माऊलींची सखीसोबती- दिशादर्शक अन् शेवटच्या क्षणापर्यंत कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष सेवाभावी अंगणवाडी मदतनीस .....
तुझ्याविषयी लिहितांना हृदय भरून आले. मला पाटीवर पहिला अ शिकविला... सोबत शाळेत नेले.माझ्या पेक्षा ४-५ वर्षाने मोठी पण सदैव आईसारखी वाटणारी माझी आत्या....
आम्हा सर्वांना सोडून गेली. तिला जगायचे होते.स्वतःसाठी नाही,आपल्या बापाविना पोरक्या मुलांसाठी......
अंगणवाडी मदतनीस म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत कर्तव्यदक्ष असणार्या माऊलीच्या जीवन प्रवासाला शतशः नमन.....
विजय छगन ब्राम्हणे
७०५७२६५५९७, ९४२२३६५५९७
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा