उस्मानाबाद (राहुल शिंदे)दि.30 कोरोनाचा आजाराचा संसर्ग कमी झाला असून आणि दुसरीकडे प्रतिबंधात्मक लसही आली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता दुसऱ्या टप्प्यात 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत येणे पसंत केल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता राज्याची परिस्थिती पाहून तिसऱ्या टप्प्यात 1 मार्चपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत.त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे या कालावधीत तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत होणार आहे. यंदा शाळा उशिरा सुरू झाल्याने बोर्ड परीक्षेसाठी 25 टक्के अभ्यासक्रम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, 40 टक्के अभ्यासक्रम कपातीची चर्चा होती. त्याला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला असून, 25 टक्केच अभ्यासक्रम कपात करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
दुसरीकडे त्या म्हणाल्या, तूर्तास अंगणवाडी व बालवाडी यंदा सुरू करण्याचे नियोजन नसून आगामी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्याच्या दृष्टीने ठोस नियोजन सुरू आहे. शैक्षणिक वर्ष सुरू करताना शाळा सुरू न झाल्याने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा दोन महिने (1 मार्च ते 30 एप्रिल) भरविण्याचे नियोजन केले जात आहे. त्याबाबत 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कठीण काळातही शिक्षक, मुख्याध्यापक, सर्वजण उत्तम काम करत असून आजवर एकही मुलगा कोरोनाच्या विळख्यात सापडला नसल्याचे त्यांनी कौतुकही केले.
शाळांची स्थिती...
(पाचवी ते आठवी)
एकूण शाळा : 1,06,491
एकूण विद्यार्थी : 78,47,000
शिक्षक संख्या : 1,72,623
शिक्षकेतर कर्मचारी : 30,574
(नववी ते बारावी)
एकूण शाळा : 22,204
एकूण विद्यार्थी : 56,48,028
एकूण शिक्षक : 2,27,775
एकूण शिक्षकेतर कर्मचारी : 92,343
(पहिली ते चौथी)
एकूण शाळा : 1,34,936
एकूण विद्यार्थी : 1.26 कोटी
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या...
कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि प्रतिबंधात्मक लस आली म्हणून नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले
पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलांची उपस्थिती पाहून घेतला जाईल पहिली ते चौथीच्या शाळांचा निर्णय
मार्चपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन; सुरू झालेल्या शाळांचा दररोज घेतला जातोय आढावा
दररोज तीन तास, तीन विषयांनाच दिले जात आहे प्राधान्य; मुलांच्या आरोग्याला पहिले प्राधान्य, अंगणवाडी, बालवाडी यंदा सुरू होणार नाहीत
पाचवी ते बारावीपर्यंतच्या एक लाख 28 हजार 695 पैकी 68 टक्के शाळा सुरू झाल्या असून एक कोटी 34 लाख 95 हजार 28 पैकी 34 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा