Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

जामनेर तालुका ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये ८२ टक्के मतदान...!



जामनेर -प्रतिनिधी: तालुक्यातील आज झालेल्या ६९ ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८२ टक्के मतदान झाल्याचे वृत्त असून काही ग्रामपंचायतीमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगा दिसत होत्या. आज मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला  नसल्याचे कळत असून लोंढरी येथे  मतदान केंद्रावरील वोटिंग मशीन मध्ये बिघाड झाल्याने सुमारे एक तास मतदाराला मतदानापासून वंचित रहावे लागले. त्याच प्रमाणे सावरला येथे वोटिंग मशीन मध्ये तांत्रिक बिघाड  झाल्याने याठिकाणी मतदारांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले.

शहरातील जळगाव रोडवरील आयटीआय प्रांगणात मतदान पेटी संकलन केंद्र उभारण्यात आले असून याच ठिकाणी दिनांक १८रोजी मतमोजणी होणार आहे. धुळे येथील अ. मुख्य कार्यकारी अधिकारी हे संदीप माळोदे जामनेर येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असून  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  तहसीलदार अरुण शेवाळे यांनी चोख व्यवस्था ठेवली असून सर्व परिस्थितीवर ते नियंत्रण ठेवून आहेत. 

तालुक्‍यात एकूण ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पैकी चार ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध निघाल्याने ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आज काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडल्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६. ४७% मतदान झाल्याचे वृत्त असून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुमारे ८२ टक्के  अंदाजे मतदान झाल्याचे माहिती प्रशासकीय सूत्राकडून मिळाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध