Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ मार्च, २०२१

सुनिल मोरे यांची आर्टबिट्स राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड..!



“आर्ट बिट्स पुणे” या नामांकित संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या सन 2020-21 या वर्षासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली असून,यात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुनिल मोरे यांची “बेस्ट आर्ट टीचर” या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
आर्टबिट्स संस्था गेले अनेक वर्षे देशभरातील कलाकारांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांचे आयोजन करीत आहे. कलाक्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या कलाकारांना आणि कलाशिक्षकांचा याद्वारे यथोचित सन्मान ही संस्था करीत आहे. मानाचा प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या आर्ट बिट्सच्या या पुरस्कारासाठी अतिशय पारदर्शीपणे निवड करण्यात येते. राज्यातील-राज्यभरच्या पुरस्कारार्थी मध्ये धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील चुडाणे शाळेतील शिक्षक सुनिल मोरे यांना हा पुरस्कार त्यांच्या नाविन्यपूर्ण हस्तकला उपक्रमासाठी प्रदान करण्यात येणार आहे.


सुनिल मोरे हे या पुरस्कार श्रेणीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर कार्यरत असणारे शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या उपक्रमशीलतेतून आजवर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्याचप्रमाणे ते राज्य अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती येथे समितीत कार्यरत आहेत. शाळाबाह्य मुलांचे शिक्षण, शाळाबाहेरील शिक्षण यांसह अनेक नाविन्यपूर्ण अशा अनेक उपक्रमाबरोबर त्यांनी सामाजिक जाणिवेतून आणि पर्यावरण रक्षणाच्या तळमळीतून टाकाऊतून हस्तकलाकृती निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे.निसर्गातील साधनसंपत्तीचा पुनर्वापर करत हस्तकला क्षेत्रात गेले अनेक वर्षे ते भरीव योगदान देत आहेत.
एक शिक्षक म्हणून केवळ वेतनापुरती बांधिलकी न ठेवता काहीतरी वेगळं करावं, पर्यावरणाचे देणं द्यावं , आणि स्वतःमधील कलागुणांना विकसित करता करता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा या महत्वाकांक्षेतून त्यांनी आजवर हजारो कलाकृती आपल्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या आहेत. या अभिनव उपक्रमामुळे ते राज्यभर "हस्तशिल्पकार " म्हणून देखील परिचित आहेत. याशिवाय आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील संक्रमित केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी कार्यशाळा , प्रदर्शने यातून देखील त्यांनी अनेकांना प्रशिक्षित करून त्याद्वारे रोजगाराचा मार्ग दाखवला आहे. त्यांना अनेक संस्था, संघटना व व्यासपीठावर सन्मानित करण्यात आले आहे. इंडिया बुक, लिम्का बुक यात देखील त्यांच्या विक्रमाची नोंद घेतली गेली आहे. नुकत्याच संपन्न होत असलेल्या राष्ट्रीय खेळणी जत्रेत देखील त्यांच्या हातून साकारलेल्या कलाकृती-खेळणी घेतल्या गेल्या आहेत. यापूर्वी त्यांनी "शिक्षणाची वारी" यातून सर्वोत्तम सादरीकरणाच्या आणि प्रेक्षकांच्या भेटीचा उच्चांक मोडणारा स्टॉल म्हणून आपल्या कलेचा ठसा संपूर्ण राज्यसमोर उमटविला आहे.सुनील मोरे यांच्या या राष्ट्रीय पुरस्कारासाठी सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कलाक्षेत्रात अग्रक्रमाने नाव असणाऱ्या आर्ट बिट्स पुणे या संस्थेने मी सातत्याने करीत असलेल्या कला साधनेसाठी, माझ्या कलेवरच्या निस्सिम प्रेम,आदर आणि निष्ठा यांची दखल घेऊन हस्तकला क्षेत्रातून राष्ट्रीय पुरस्कारासाठी माझी निवड केल्यामुळे निश्चितच आपले मनोबल उंचावले आहे. भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याची उर्मी मला मिळाली असून अंगी लाभलेल्या कलेच्या प्रतिभेतून मला माझ्या छोट्याशा शाळेचे नाव मोठे करता येत आहे, याचा विशेष अभिमान वाटतो. अशी भावपुर्ण प्रतिक्रिया सुनील मोरे सर यांनी व्यक्त केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध