Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १२ मार्च, २०२१

जेवण न मिळाल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रस्त्यावर.!



शेगाव:शहर प्रतिनिधी (उमेश राजगुरे) दुपारी 2 वाजले तरी सकाळचे जेवण आले नाही त्यामुळे भुकेने व्याकुळ झालेले 100 ते 150 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क येथील आनंद सागर विसावा कोविड केअर सेंटर मधून बाहेर पडत रस्त्यावर आल्याने एकच खळबळ उडाली होती.सदर घटना 12 मार्च रोजी दुपारी घडली.

याबाबत असे की,येथील बाळापूर रोडवरच्या आनंद सागर विसावा येथे प्रशासनाने कोरोना बाधित रुग्णासाठी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.याठिकाणी भरती रुग्णांना शासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदारा कडून चहा नाश्ता जेवण वितरित केले जाते.दररोज सकाळी 11.30 वा.सेंटर मध्ये येणारे भोजन 12 मार्चला दुपारी 2 वा. पर्यंत न आल्याने भुकेने व्याकुळ होऊन सर्व रुग्ण संतप्त होऊन कोविड सेंटर बाहेर निघून बाळापूर  रस्त्याजवळील प्रवेशद्वार पर्यत आले होते.याबाबतची माहिती मिळताच प्रशासन खळबळून जागे झाले.

तहसीलदार शिल्पाताई बोबडे बाहेर असल्याने त्यांनी लगेच नायब तहसीलदार डॉ सागर भागवत व इतर कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाठवले.काहीवेळातच महसूल पथक आणि शहर पोलिस तेथे पोहचले आणि त्यांनी रुग्णाची समजूत काढली.व संबंधितास रुग्णांना नियमित वेळेवर पोटभर  जेवण देण्याचे निर्देश दिले.गॅस नळी लिकेज झाल्याने जेवण तयार करण्यास वेळ लागल्याचे यावेळी भोजन वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

येथे मिळणाऱ्या अल्पोपहार तसेच जेवनाचा दर्जा निकृष्ट असून भोजनात दोनच पोळ्या दिल्या जातात त्यामुळे आमचे पोट भरत नाही परिणामी उपाशी राहावे लागत असल्याचे आरोप यावेळी काही रुग्णांनी केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध