Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ मार्च, २०२१

फरार मॅनेजर सुनील वाडीले वर गुन्हा दाखल केव्हा ? सहकार विभाग आणि पोलीस यंत्रणा सुस्त का! ;ठेवीदार सभासंदा सवाल

                                                 
                                                      शिंदखेडा दि.२४ (प्रतिनिधी) विशेष लेखापरीक्षणात या संस्थेचे मॅनेजर सुनील वाडीले व संचालक विजय महाले यांना दि.२ डिसेंबर २०२० या दिवशीच झालेल्या भ्रष्टाचाराच्या अफरातफर प्रकरणात कलम ८८ खाली चौकशी करणे कामी अॅड. एस.एन.जाधव यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून शासनाने नेमणूक केली होती. त्यादिवशी यात महाठगाने पंधरा दिवसांची मुदत मागून दि.१८ डिसेंबर रोजी पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली होती. या काळात देखील संचालक मंडळाला अनभिज्ञ ठेवण्यात आले होते. त्यादिवशी संस्थेतर्फे मॅनेजर हजर झालेत व पुन्हा सुनावणीची तारीख घेऊन दि.८ जानेवारी २१ रोजी देण्यात आली. 

या दिवशी मॅनेजरवर दबाव वाढल्याने लेखी खुलासा देऊन चौकशी कामातील रक्कम सुमारे ६३ लाख ८ ते १० दिवसात वसूल करून देतो असे सांगुन संस्थेत ८३ लाखांचे चेक प्राप्त झाले आहेत. तेव्हा एक महिन्याची चौकशीची मुदत द्यावी अशी लेखी विनंती केली आहे. त्यानुसार पुन्हा दि.१२ जानेवारी २१ रोजी सुनावणीची तारीख देण्यात आली होती.परंतु या काळातही संचालक मंडळ अनभिज्ञ होते व मॅनेजर त्या दिवसापासून गायब झाले आहेत.

या काळात पतसंस्थेस खरोखर वरील रकमेचे जर आदेश प्राप्त झाले किंवा काय याबाबत शासनाच्या वतीने दि.२२ जानेवारी रोजी प्राधिकृत चौकशी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहून चौकशी केली असता संचालक मंडळाने आम्हाला काहीही माहिती नाही, आम्हाला कोणत्याही नोटिसा आजपर्यंत मिळालेल्या नाहीत असा खुलासा संचालकांनी केला. संस्थेचे सचिव म्हणजेच मॅनेजर सुनील वाडीले गेल्या दहा-बारा दिवसापासून बाहेरगावी आहेत असे सांगून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता १५ दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी संचालक मंडळाने केली व सदर कालावधीत आवश्यक ती माहिती प्राप्त करून गैरव्यवहार झालेल्या रकमांबाबत संचालक मंडळाने लेखी खुलासा दिला आहे. 

या सर्व घटनेत शिंदखेडा शहरातील सहकार क्षेत्रातील नामांकित अग्रगण्य अशा दि.हस्ती को-ऑपरेटिव बँकेतून चलनाद्वारे पैसे भरल्याचा देखावा करीत दि.हस्ती को-ऑपरेटीव्ह बँकेचे बनावट चलन व शिक्क्यांद्वारे केलेला आहे. यातील पुरावा म्हणजे दि.हस्ती को-ऑपरेटीव्ह बँकेचे भरणा चलन क्र.०६०३६१४ द्वारे भरणा रुपये ४० लाख व भरणा चलन क्र.०६०३६१५ भरणा रक्कम ४३ लाख असे बनावट चलनांद्वारे सदर महाठगाने दि.५ जानेवारी २०२१ रोजी बँकेत एकूण ८३ लाख रुपयांचा भरणा केल्याचे बनावट कागदपत्रांमधुन सादर केले आहे. 

मात्र संचालक मंडळाने बँकेत या भरणा रकमांची चौकशी केली असता असा कोणताही भरणे रोख अथवा चेक मार्फत झालेले नसल्याचे शाखाधिकाऱ्याने संचालकांना सांगितले. यातून या महाठगाने यापूर्वीदेखील अश्या बनावट पावत्यांद्वारे संस्थेच्या नावे भरणा अथवा विड्रावल केल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अश्या या महाठगावर सहकार खात्याने व संस्था नोंदणी अधिकारी यांनी कोणती कार्यवाही केली. 

याबाबत कोणताही उलगडा अथवा खुलासा प्राप्त झालेला नाही. तसेच या महाठग जोडीतील एक संचालक विजय महाले यांनी जामिनकी कर्जापोटी संस्थेस धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३० लाख व ३३ लाख असे एकून ६३ लाखाचे दिलेले दोन्ही चेक बाऊंस झाले आहेत. तसेच सदर संचालकाने संस्थेत ६३ लाख रुपये कर्ज मुद्दल व त्यावरील होणारे व्याजापोटी संस्थेस नोटरी करुन दिलेली आहे. 

तसेच सदर नोटरीत कुमरेज येथील सामुहिक बिगर शेती गट क्र.५४ मधील जागा देखील लिहून दिली आहे. तरी सदर जागेवर तात्काळ संस्थेने आपला बोजा चढवून त्याबाबत नोंदणी अधिकाऱ्यांकडून जप्ती पंचनामा मिळवून जाहिर विक्री करावी तसेच यातून संस्थेची पूर्ण रक्कम वसूल होत नसल्यास सदर संचालकाचा इतर मालमत्तेवर देखील संस्थेचे बोजे चढवण्यात यावेत अशी संचालक मंडळात व संस्थेच्या सभासदांमध्ये चर्चा सुरु आहे. याबाबत शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशी जोरदार मागणी आता सभासदांमधून व सहकार क्षेत्रातून जोर धरत आहे. (सविस्तर वाचा पुढच्या अंकात)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध