परंडा (राहूल शिंदे)दि.13 तालुक्यातील 11केव्ही सबस्टेशन शेळगाव मार्फत वीजचोरी विरुध्द धडक मोहीम राबवली जात आहे राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे अनेक भागात पुन्हा एकदा अचानक भारनियमन सुरू झाले आहे. उन्हाळ्याचे दिवसअसल्याने विजेची सर्वत्र मागणी वाढली आहे. विजेचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी शेळगाव महावितरणने वीज चोरांवर धडक कारवाई सुरु केली आहे.तांदुळवाडी येथे चार कृषी पंप तर शेळगाव येथे आठ व्यावसायिक वीज चोरी करतांना सापडले.
सध्या संपूर्ण राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका करून घेण्यासाठी कूलर, पंखे, एसी अशा पर्यायांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवाय, अशा उष्णतेत थंड पाण्याचे प्लांट, रसवंती, आईस्क्रीम पार्लर, विविध ठिकाणी थाटले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे रोजची विजेची मागणी प्रचंड वाढली आहे.
जेवढी विजेची मागणी आहे, तेवढा वीज पुरवठा मात्र होत नाही. परिणामी राज्यात अनेक भागात भारनियमन सुरू झाले आहे. उन्हाळी हंगामात सुरू झालेले उद्योग हे अनेकदा वीज चोरी करून सुरू राहतात.तसेच ठिकठिकाणी आकडे टाकून, चुटके जोडून मोठ्याप्रमाणात वीज चोरी केली जात आहे. त्यामुळे शेळगाव महावितरण विभागाने अशा सर्व उन्हाळी उद्योगांची आणि घरगुती व कृषी वीज मीटरची तपासणी सुरू केली आहे.
ज्या भागात विजेची चोरी सुरू आहे त्या भागातील लोकांनी महावितरणला याबाबत गोपनीय माहिती द्यावी,ज्यांचे अद्यापही वीज कनेक्शन नाही त्यांनी वीज कनेक्शन घेऊन सहकार्य करावे असे आवाहन आनाळा शाखेचे कनिष्ठ अभियंता नागरगोजे यांनी केले आहे.
वीज चोरी ही एक मोठी समस्या आहे. नियमित वीज बिल भरूनही अनेकांना भारनियमनचा नाहक त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच महावितरणने वीज टंचाईच्या काळात वीज चोरांविरुद्ध मोहीम उघडल्याने त्याचा फायदा प्रामाणिक ग्राहकांना होणार आहे. ही मोहीम केवळ शेळगाव विभागात न राबवता संपूर्ण राज्यात काटेकोरपणे राबवली गेल्यास विजेचा तुटवडा कमी होऊन भारनियमनातून मुक्तता मिळेल अशी अपेक्षा कनिष्ठ अभियंता राजपूत यांनी व्यक्त केली आहे .
यावेळी शेळगाव शाखेतील वरीष्ठ तंत्रज्ञ गोकुळ डोके, म्हेत्रे, कांबळे, पवार , तंत्रज्ञ बालवीर शिंदे, नाना टकले, नाना केत, मोगल, भाऊसाहेब जगताप आदी उपस्थितीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा