Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ मे, २०२१

दोंडाईचा येथील बोगस बियाणे विक्रेत्याची माहिती काढत, गुन्हा दाखल...



दोंडाईचा प्रतिनिधी: धुळे जिल्हा कृषी कार्यालय व शिंदखेडा पंचायत समिती कृषी कार्यालय यांनी संयुक्तरीत्या बोगस बियाणे विक्रेत्यांची माहिती काढत, दोंडाईचा तालुका शिंदखेडा येथील बोगस बियाणे विक्रेत्यावर  धडक कारवाई केली असून बोगस बियाणे जप्त करत विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.यामुळे सदर कार्यवाहीमुळे बोगस बियाणे विक्रत्यांमध्ये धडकी भरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शिंदखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कृषी योगेश पदांमसिंग गिरासे यांना गोपनीय बातमीदार द्वारे माहिती प्राप्त झाली होती की, दोंडाईचा येथील श्रीनाथ फर्टीलायझर येथे बोगस कापसाच्या बियाण्यांची विक्री होत आहे. सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर आपले वरिष्ठ कार्यालयाला सूचित केले व एक पथक तयार करून दिनांक २५ मे मंगळवार रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दोंडाईचा स्टेशन भागातील कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्समधील मे. श्रीनाथ फर्टीलायझर या बियाणे विक्री केंद्रावर छापा टाकून कारवाई केली

असता सदर ठिकाणी विनापरवाना अनाधिकृत एच.टी.बी.टी कापूस बियाणे छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याचे आढळून आले. सदर दुकानाच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणी मध्ये बोगस संशयित अनाधिकृत एच.टी .बी.टी. संकरित कापूस बियाण्याची वेगवेगळ्या तीन वानांची पाकिटांचे ४८ पाकिटे प्रत्येकी ४५० ग्रॅम वजनाचे आढळून आले .यावर उत्पादकाचे नाव, चाचणी ,अंतिम दिनांक इत्यादी नमूद केलेले दिसून आले नाही.  

याबाबत दुकान दुकान मालक कमलेश नारायण कुंभार वय 33  राहणार रामी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांना विचारपूस केली असता सदरच्या माल नंदुरबार येथील  शैलेश वाणी यांच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले. मात्र याबाबतची बिले आणि इतर कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध झाले नाहीत म्हणून पंचांसमक्ष कारवाई करत सदरच्या दुकानातून संकरित कापूस रूट ५५  ची १८ पाकिटे किंमत १३८०६/ रुपये ,संकरित कापूस पिंक ५ जी २ जी याची १६ पाकिटे किंमत १२२७२/ रुपये ,संकरित कापूस इजरायल ४ जी १४ पॉकेट किंमत १०७३८/ रुपये असा एकूण ३६ हजार ८१६/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत विस्तार कृषी अधिकारी योगेश गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोंडाईचा शहर पोलीस स्टेशन येथे दुकानदार ,उत्पादक कंपनी ,नंदुरबार येथील विक्री करणारे अशा सर्वांच्या विरोधात  बियाणे नियंत्रण कायदा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई कृषि विकास अधिकारी जिल्‍हा परिषद धुळे प्रल्हाद मोतीलाल सोनवणे, कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा योगेश गिरासे ,मोहिम अधिकारी ए एन कोर व साक्री पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश नेतनराव इत्यादींच्या पथकाने केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध