Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर केंद्रीय नेतृत्व नाराज- सूत्रची माहिती, केंद्र सरकारच्या योजना राज्यात नीटपणे पोहोचवल्या नसल्याने केंद्रीय नेतृत्वाची खप्पा मर्जी महाविकास आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यात चंद्रकांत पाटलांना अपयश



भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दिल्ली हायकमांड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बी. एल.संतोष यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. *एबीपी माझा* ला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसात चंद्रकांत पाटील राज्य भाजपचं नेतृत्व करत असताना त्यांचा कारभार सर्वसमावेशक नसल्याच्या तक्रारी होत्या. हाच धागा पकडून काल झालेल्या तीन तासाच्या बैठकीत दिल्ली हायकमांडने चंद्रकांत पाटील यांची शाळा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील महा विकास आघाडी विरोधात रान उठवण्यात अपयश आल्याचेही भाजपच्या हायकमांडने निदर्शनास आणून दिले.
येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशा सूचनाही भाजपा हायकमांडने दिल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराजी नेमकी कशामुळे?
देगलूर बिलोली मतदारसंघात भाजपला मोठ्या फरकाने आलेलं अपयश
राज्य भाजपातील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव
पुणे आणि कोल्हापूर वगळता चंद्रकांत पाटील यांचा राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी फारसा प्रवास नाही
शंभर कोटी लसीकरण झाल्याबद्दल राज्य भाजपमध्ये फारसे कार्यक्रम झाले नाहीत
आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम राज्यात नीटपणे राबवला नाही
नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय राजकीय जीवनाची २० वर्षे या कार्यक्रमाची ही नीट आखणी झाली नाही.
याबद्दल केंद्रीय नेतृत्व चंद्रकांत पाटील यांच्या कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशा सूचनाही केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध