Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

असा वाढदिवस साजरा करणे कितपत योग्य? वेळीच दखल घेत भविष्यातील गंभीर घटना रोखणे अत्यावश्यक...



'जन्म' आणि 'मृत्यू' या आयुष्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या सुखदुःखाच्या गोष्टी आहेत. यातील प्रत्येकाला आपल्या जन्माबद्दल आणि त्या दिवसाबद्दल पदोपदी अत्यानंद असतो. किंबहुना जवळपास सर्वच जण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक असतात.सद्यस्थितीत दिवसेंदिवस वाढदिवस साजरा करतांना सर्वत्र स्पर्धात्मक वातावरण निर्माण केले जात आहे. विशेष म्हणजे याची "क्रेझ" कमी न होता दिवसागणिक अधिकच वेगाने वाढत आहे.अनेकांकडे महागडे स्मार्टफोन्स असतात त्यानुसार मित्रपरिवार देखील मोठा आणि स्मार्ट असणे स्वाभाविक आहे.

आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी सेलिब्रेशन बघून ते आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचे जाणवू देत नाहीत.
आता मित्र म्हटले की,आपलेपण,प्रेम, जिव्हाळा, मस्ती आणि प्रेमळ भांडणी या गोष्टी नकळत मित्रांच्या वाट्याला येतातच.जर एखाद्याच्या मित्र परिवारामध्ये,
ग्रुपमध्ये एखाद्या मित्राचा वाढदिवस असेल तर त्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या मित्रपरिवाराने सोशल मीडियावर बॅनरबाजी पासून तर मोठ-मोठे केक कापून सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यापर्यंत आणि पार्टी पासून तर वादंगापर्यंत प्रत्येक भाऊ-दादाचं अगदी सूक्ष्म नियोजन केले जाते. मात्र हे सर्व करत असतांना "बर्थडे पार्टीची" मंडळी सर्व काही विसरून हे कृत्य करते की काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सद्यस्थितीत साजऱ्या होणाऱ्या वाढदिवस सेलिब्रेशन कडे बघून पडतो.

मुळात वाढदिवस हा प्रत्येकासाठी अनमोल क्षण असतो आणि त्या दिवशी मोठ्या आनंदाने आपण आपल्या जन्मदिवस साजरा करावा ही बाब स्वाभाविक आहे हा क्षण आनंदाने साजरा केलाच पाहिजे मात्र त्यात परिसीमा ओलांडता कामा नये म्हणजे झाले. अलीकडेच समाजात घडणाऱ्या घटना पाहता तरुणाई बर्थडे सेलिब्रेशन च्या नावाने सर्वच नियम,नीतिमत्ता, संस्कृती आदींची पायमल्ली करतांना दिसतात याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने केलेली मैत्री व या मैत्रीत मित्रांकडून जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या चुका, गटबाजी, पार्ट्यांमध्ये होणारे वाद आदी गोष्टी प्रकर्षाने समोर येतात. ग्रुप मधील एखाद्या मित्राचा वाढदिवस असेल तर सामुदायिकरीत्या भर रस्त्यावर,चौका-चौकात दुचाकीवर किंवा हॉटेल्समध्ये मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार हल्ली मोठ्या प्रमाणात बघावयास मिळत आहेत.अनकेदा तर केक कापण्यासाठी तलवारीचा वापर केला जातो ही अतिशय गंभीर बाब आहे. 

यातून आयोजकांना नेमके काय साध्य करायचे असते.याचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. अशा प्रकारांमुळे भविष्यात येणाऱ्या पिढीवर कोणते संस्कार पडणार याचे आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे.एखाद्या प्रकरणात पोलीस प्रशासन देखील एखादी तक्रार समोर आली की अँक्शन मोडमध्ये येते.मग कायमस्वरूपी अंकुश बसणार तरी कसा? यासाठी कठोर नियमावली असणे गरजेचे आहे.

बर्थडे साजरा करतांना बर्थडे बॉय-बर्थडे गर्लच्या चेहऱ्यावर केक लावणे,अंडी मारून फेकणे,मेणबत्ती समोर स्प्रे उडविणे,
केकमध्ये चेहरा खुपसने आदी प्रकार सद्यस्थितीत भयंकर प्रमाणात घडत आहेत. विशेष म्हणजे हे कृत्य करीत असताना संबंधितांना कायद्याचा, त्यातून अनावधानाने होणाऱ्या अपघाताचा व होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा कुठलाही धाक नसतो. हे देखील सत्य आहे.

काही दिवसांपूर्वीच मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमंडळी भर रस्त्यात रात्रीच्या सुमारास दुचाकीवर बर्थडे साजरा करतात. त्यानंतर केक कापतात त्याचे तोंड पूर्णता केक मध्ये दाबून आपल्याच मस्तीत रमतांना दिसतात दुर्दैवी बाब म्हणजे त्या मित्रांनी बर्थडे बॉय चे हात-पाय धरून त्याच्यासोबत तुफान मस्ती देखील केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. परिणामी क्षणाचाही वेळ या मित्रांनी त्या बर्थडे बॉयला न दिल्याने त्याचा श्वासोच्छ्वास बंद झाला त्यानंतर तेच मित्र त्याच दुचाकीवर बसवून उपचारासाठी घेऊन जातात याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

यासोबतच केक कापतांना मेणबत्ती विझविण्यासाठी बर्थडे बॉयचा चेहरा  येताच स्प्रे उडवला जातो त्यामुळे अग्नी व गॅस यांचा संपर्क होताच बर्थडे बॉयचा चेहरा जळाल्याच्या घटनाही काही कमी नाहीत.
एकूणच अशाप्रकारे केक कापून किंवा मौज-मस्ती करून वाढदिवस साजरा करणे कितपत योग्य आहे याचा प्रत्येकाने विचार करण्याची आज नितांत गरज आहे. 

कारण यातून आनंद तर दूरच आहे मात्र चक्क एखाद्याच्या जीवाची "बाजीच" येथे लावली जाते व परिणामी मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आत्मचिंतन करून असे वाढदिवस साजरे करून काय साध्य होते असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे तर उत्तर नक्कीच मिळेल.याउलट आपला वाढदिवस गोरगरिबांमध्ये जाऊन विधायक कार्य करून साजरा केल्यास निश्चित सकारात्मक बदल समाजात घडून येईल.यासाठी शासनाने, सामाजिक संघटनांनी व पोलीस प्रशासनाने व्यापक प्रमाणात जनजागृती करुन भविष्यात मोठ्या  गंभीर घटना घडण्याआधीच यावर अंकुश बसविणे अत्यावश्यक आहे.

लेखक:-
श्री.विशाल रविंद्र बेनुस्कर
आदर्श कॉलनी, पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे संपर्क:-९४०५८३४२९२

1 टिप्पणी:

प्रसिद्ध