Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

धुळे,जळगाव,नाशिक,नंदुरबार जिल्ह्यांत शिक्षण विभागात राज्यात सर्वाधिक भ्रष्ट्राचाराचा धुमाकुळ दि.29/01/2022 हजारो टी. ई. टी. अपात्र शिक्षकांच्या हाती ताबडतोब नारळ द्या ! आणि त्यांना जय महाराष्ट्र करा.



धुळे,जळगाव,नाशिक,नंदुरबार जिल्ह्यांत शिक्षण विभागात राज्यात सर्वाधिक भ्रष्ट्राचाराचा धुमाकुळ आहे.पण राज्यातील परीक्षा मंडळाने तर कहरच केला.त्यांच्या टीईटी परिक्षा अपात्र उमेदवारांना पात्र करण्याचे आवाक् करणारे प्रकरण गेल्या महिनाभरापासून गाजत आहे.या मंडळाचे प्रमुख तुकाराम सुपे,परीक्षा प्रक्रिया राबविणारे जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे डॉ.प्रितेश देशमुख व संपूर्ण टोळीचे कोट्यवधींचे कारनामे देशभर गाजत आहेत.या टोळीने सन २०१९ - २० या वर्षात राज्यभरात तब्बल ७ हजार ८०० अपात्र उमेदवारांना शिक्षक भरती साठी पात्र ठरविले असल्याचे उघड झाले आहे . चौकशी अंती हा आकडा बाहेर आला आहे अजुन सन २०१८ ची पडताळणी सुरु आहे.

या परिक्षेचा मुळ निकाल व प्रत्यक्ष जाहीर निकाल यात मोठीच तफावत आढळत आहे.एकेका अपात्र उमेदवाराकडून पात्र करण्यासाठी लाखो रुपये या मंडळींनी उपटले आहेत. कित्येक कोटीत हा व्यवहार झाला आहे.तपासी यंत्रणा पूणे सायबर पोलिसांना तर तुपे वगैरे मंडळी कडून लागोपाठ लाखो कोट्यवधी रुपये रोख व संपती चे प्रचंड दस्तावेज सापडतच होते.

दि. १३ / ०२ / २०१३ पासून शिक्षक भरती साठी टीईटी परीक्षा अनिवार्य झाली. या तारखेपासून भ्रष्ट्राचाराचे दोन मोठे प्रकार सुरु झाले.एक म्हणजे सदर शिक्षक सन २०१२ व त्या आधी पासून सेवेत असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून त्यास टीईटी परिक्षेच्या अटी व बंधनातून बाहेर काढणे.यातही प्रत्येकी लाखोंचे व्यवहार करून या प्रकारे शेकडो बनावट शिक्षकांना बॅकडेटेड दस्तावेज बनवून टीईटी मधुन पळवाट काढून देण्यात आली. कोट्यवधीं मध्ये हा व्यवहार आहे.

अॅड असिम सरोदे व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देवून याबाबत श्वेत पत्रिका काढण्याचीही मागणी केली आहे . टीईटी नियम लागू झाल्या वर दुसरा मोठा भ्रष्ट्राचार सुरू झाला.टीईटी परीक्षा पास होवू न शकणार्‍या अपात्र उमेदवारांना कोरे पेपर ठेवायला लावून किंवा परिक्षा निकालात मॅनेज करून त्यांना पास करणे व पात्र दाखविणे.हे प्रकार सुरु झाले.यात जी.ए.सॉफ्टवेअरचा मोठा रोल आहे. म्हाडा,आरोग्य विभाग या परिक्षांतही परिक्षा मंडळाने हे उद्योग केले.

एका प्रकरणातून दुसरे अशी ही कडी वाढत गेली.एखाद्या कर्पोरेट कंपनी प्रमाणे राज्यभर यांचे एजंट काम करु लागले . सुपेचा ड्रायव्हर सुनिल घोलप बरीच सुत्रे हलवू लागला होता.पकडला गेल्यावर सुपेने बड्यांचा सहभाग वगैरे म्हणत आत्महत्या कराविशी वाटते म्हटले.एक दलाल सानप व मराठवाड्यातील एका माजी मंत्र्यांचे या प्रकरणातले संबंध खूप चर्चिले गेले.थेट मंत्रालयापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे चर्चिले गेले आहेत . यातले संतोष हरकळ,अंकुश हरकळ,वगैरे बरेचसे एजंट पकडले गेले.धुळ्यातील तीन एजंटांबाबत पुण्यातील आयुक्त अमिताभ गुप्तांकडे तक्रार आहे पण अद्याप कारवाई नाही.दोंडाइचा येथील व नंदुरबार जिल्ह्यातील एजंटही अद्याप कारवाई च्या प्रतिक्षेत आहेत.शासनाने आता २०१३ पासूनच्या सर्व रुजू शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्र तपासणी लावली आहे.

७ जानेवारी पर्यंत शिक्षकांनी मुळ प्रमाणपत्रे तपासणी साठी सादर करावयाची होती.आतापर्यंत ५ हजार ५०० प्रमाण पत्रे पडताळणी साठी सादर झाली आहेत.बरीच प्रमाणपत्रे आलेली नाहीत. मध्यंतरी ३ वर्षे टीईटी परिक्षा पुढे ढकलली जात होती . त्यानंतर दि. २१ / ०१ / २ ० २१ रोजी ही परिक्षा झाली.त्यावेळी बरेच प्रामाणिक उमेदवार एसटी संपामुळे परिक्षेला हजर राहू शकले नव्हते.ते आता नव्याने परिक्षा घेण्याची वाट पाहात आहेत परिक्षा मंडळाने अपात्र उमेदवारना पात्र दाखवून प्रमाणपत्रे विक्री केल्याची ७ हजार ८०० प्रमाणपत्रे प्रथम टप्प्यात उघड झाली आहेत. १९ - २० मध्ये १६ हजार ५९२ प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत. अजून त्या आधीचीही प्रमाणपत्रे आहेत.

या सर्व प्रमाण पत्रांची पडताळणी व या गँग मधील सर्व बडे मासे आणि गावोगावचे एजंट हे सर्व तपासी यंत्रणेच्या ताब्यात आपल्यावर हा आकडा अजुन मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो.आज गावागावात प्रामाणिक शिक्षक उमेदवार बेरोजगार फिरत आहेत आणि अपात्र बोगस उमेदवार त्यांचा हक्क हिरावून शिक्षक बनुन रुजू झालेले आहेत.अनैतिक मार्ग अवलंबून शिक्षक बनलेले हे हजारो अपात्र शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना व देशाच्या भावी पिढीला नैतिकतेचे कोणते धडे शिकवित असतील? हा आजचा सर्वात मोठा चिंतनाचा विषय आहे.

या भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणात अजुन जे जे सापडतील त्यांची मुळीच गय होता कामा नये.शिवाय अपात्र शिक्षकांनाही शासनाने ताबडतोबीने हाती नारळ दिला पाहिजे . ज्यांचा हक्क डावलला गेला त्या प्रामाणिक शिक्षक उमेदवारांना न्याय देण्यासाठी लागलीच नव्याने प्रक्रिया सुरु केली पाहिजे .

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध