Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १० जानेवारी, २०२२

"वाचन संस्कृती काळाची गरज"..!प्रा.डाॅ. गोविंद पाटील.




"माऊली कृपा वनधन केंद्र" रगतविहीर ता. सुरगाणा जि.नाशिक येथील दि.०८ जानेवारी रोजी आयोजित भव्य शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धा या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले साहित्याभ्यासक व लेखक प्रा.डाॅ.गोविंद पाटील यांनी "वाचन संस्कृती वृद्धिंगत होणे काळाची गरज" या विषयावर अतिशय विस्तृत विचार मांडले. वाचनाने माणसांच्या जाणिवा समृद्ध होतात,अनेक थोर महात्म्यांच्या कार्याच्या व चरित्राच्या अभ्यासाने आपले जीवन संपन्न व समृद्ध होते,साहित्यातून माणसांची वैचारिक जडणघडण होते. 

जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीशी संघर्ष करायला शिकवते ते साहित्य.
वाचनाने माणूस सुशिक्षित,सुसंस्कृत अर्थात चांगला माणूस घडतो असे सांगताना स्वातंत्र्यवीर सावरकर,कुसुमाग्रज,साने गुरुजी,डॉ. आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, बाबुराव बागुल, नारायण सुर्वे,डॉ.नरेंद्र जाधव, ताराबाई शिंदे आदि साहित्यिक व त्यांच्या ग्रंथसंपदेची समर्पक दाखले देत वैचारिक व विस्तृत मांडणी डाॅ.पाटील यांनी केली.
           
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युवकांचे प्रेरणास्थान, सुरगाणा तालुक्याचे तरूण तडफदार, झुंजार नेते, तरूणांचे आयकॉन तथा सुरगाणा पंचायत समितीचे सभापती मा.काॅ.इंद्रजित दादा गावित यांनी भुषविले.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तरूणांनी जागृत होणे गरजेचे आहे व सक्षमपणे विधायक दृष्टिकोन घेऊन रचनात्मक कार्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. 

आपल्या या माऊलीकृपा वनधन संस्थेमार्फत चाललेले कार्य हे आदर्शवतच आहे. व परिसरातील इतरांनाही ते प्रेरणादायीच ठरणार आहे. अशा दूरदृष्टीने समाजाच्या वैचारिक क्रांतीसाठी सुरू केलेल्या चांगल्या कामासाठी,तरूणांसाठी व गावांसाठी आम्ही सतत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासनही काॅ. इंद्रजित दादा गावितांनी दिले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.विजयजी घांगळे (सदस्य प.स.सुरगाणा), मा.श्री.भाऊसाहेब सरक (शिक्षण विस्तार अधिकारी) व प्रमुख पाहुणे म्हणून वाङ्मयाची सखोल जाण असलेले साहित्यप्रेमी मा.डॉ. मिथिलेश अहिरे व मा.प्रा.शरद मेंढेआदि मान्यवर उपस्थित होते.
           
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवसभर परिसरातील सर्व जि.प.शाळेच्या व अन्य शाळा-महाविद्यालयातील युवक युवतींच्या विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
            
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व सुत्रसंचालन प्रेरणादायी विचारांचे प्रशिक्षक मा.श्री. योगेश गावित यांनी केले तर आभार देविदास गावित यांनी मांडले.तसेच याप्रसंगी माऊली कृपा वनधन संस्थेअंतर्गत गावकऱ्यांनी व तरूण पिढीने सामुहिक योगदानातून उभारलेल्या ग्रंथालयाचे व नविन वास्तुचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
             
सदर कार्यक्रमासाठी जि.प.शाळा रगतविहीरचे सर्वशिक्षक व परिसरातील सर्व जि.प.शिक्षकवृंद,विद्यार्थी आणि रगतविहीर गावातील व पंचक्रोशीतील सुज्ञ नागरिक, पालक, आजी-माजी विद्यार्थी,व बालगोपाळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयजी घांगळे,मनिराम गावित,धनराज चौधरी, योगेश गावित,अजित गावित,कमलावती गावित,ताई सहारे,रेणुका गावित व रगतविहीर ग्रामसमीती आणि गावातील सर्व सन्माननीय ग्रामस्थ,तरूण मित्रमंडळ आदिंनी मनापासून खूप मेहनत घेतली. याबरोबरच सदर उत्सवास उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना आणि सर्व श्रोत्यांना उत्तम स्वादिष्ट भोजनाची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली होती. एकंदरीत कार्यक्रम सर्व कोरोना नियमांचे पालन करीत अत्यंत स्तुत्य व चांगला आणि अगदी आनंदी वातावरणात  संपन्न झाला.
              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध