Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

मन्हा मामान्या शंभर गायी, सकाय उठी काहीना माई! साक्री रोड छे! हा तर साक्षात कचरा रोड !! कचरा कुंडी कुठे आहे? कुणी जरा दाखवाहो



धुळे शहरातून सुरतकडे जाणाऱ्या साक्री रोडवर पूर्वी एकदा मी ‘स्वर्गाकडे’ जाणारा रोड या शिर्षकाखाली लिहिले होते. कारण त्याकाळी या रोडवर अपघाताने अनेक जण बळी गेले, जायबंदी झाले होते. कालांतराने बायपास रोड झाल्यानंतर हे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले. आता त्याच रोडला रोडवरील चित्र पाहून साक्षात कचरा रोड नामकरण करण्याची पाळी आली तरी आश्चर्य वाटायला नको. या रोडने पालिकेला अनेक नगरसेवक दिले ते रस्त्यावरून आले आणि गेले पण त्यांनी रस्त्याचा विषय दुर्लक्षितच केला. अलिकडे विद्यमान नगरसेवक हर्षकुमार रेलन हे ‘साक्री रोड’ चे भाग्य उजळणार! असे अधुन-मधून पत्रक काढत असतात. परंतु त्यांचीही ‘इच्छापूर्ती’ अद्याप कोसो दूर दिसत आहेत. साक्री रोडवरून नुसता फेरफटका मारला तरी रोडवरील विविध उद्योग (!) नवउद्योग, ट्रॅफीकवाल्या दादांची संतोषी माता चौक, सिंचन भवन चौक, हनुमान टेकडी, बायपास चौफुली येथील नाममात्र शिटीचा फुरऽऽ फुर ऽऽ चा देखावा, रस्त्यावरील बेशिस्तपणा, असुविधा पाहून परिसरातील जनताही वैतागते आणि हलकी-फुलकी ‘शिवी’ही हासडते आणि कारभारीही तिला ‘ओवी’ समजून दूर्लक्ष करतात.
आमचे ज्येष्ठ साहित्यिक जगदीशदादा देवपूरकर आणि त्यांचे सहकारी रोज पहाटे विकासासहित सुविधा हेच ब्रिद असलेल्या पालिकेच्या माध्यमातून मंगलगाणीत ‘कचरा, कचराकुंडीत टाका’ असे आवाहन करतात; पण दादा एकदा हेही सांगा की, ‘कचरा कुंडी कुठे आहे’?  स्वत: जगदीशदादा व महापालिकेचे अधिक्षक नारायणराव सोनार साहेब हे ज्या कॉलनीतून साक्री रोड परिसराकडे जातात त्यावेळी सप्तश्रृंगी मंदीर, मलेरिया ऑफीस जवळील ‘फुलराणी’, ‘सोनकळी’ सारखी सुमधुर नावाचे निवासस्थान, विद्यावर्धिनीचा कचरा नाला दमदार साहित्य निर्मिती करणारे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. श्रीपाल सबनीस यांचे निवासस्थान परिसरात कचरा निर्मिती होतेच कशी? नुसत्या लघुदृष्टीने पाहिले तरी ठिकठिकाणी पडलेल्या जनता निर्मित कचऱ्यांना  ‘कचरा कुंडी’ म्हणावी काय?
साक्री रोड वरील विनापोलीस ‘सदाखुली’ कुमारनगर पोलीस चौकी, झुलेलाल मंदीर ते टेऊँराम आश्रम परिसरातील पहाटेचे दृष्य काय दर्शविते? बुटचालक दुकानदार रोज रात्री जुनी पादत्राणे रस्त्यावर फेकतात, कदाचित गोरगरिबांनी ती उचलून न्यावीत असा त्या दुकानदारांचा उदात्त (!) हेतुही असेल पण रस्त्यावरील चांगले बुट चप्पल शोधण्यासाठी गरीब माणूस तेथे ताटकळतो पण मध्येच एखादे वाहन आले आणि माणूस उडवला गेला तर याला जबाबदार कोण? रस्त्यावर रोज दुकानदारांकडून फेकल्या जाणाऱ्या  कचऱ्याची जबाबदारी कुणाची? अर्थात रोज साफसफाई कर्मचारी कर्तव्यभावना जपत सूर्योदयापूर्वीच रस्त्यावरचा कचरा होत्याचा नव्हता करून आपली जबाबदारी पार पाडत असतात. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.
विकासासहित सेवा हे हे ब्रिद असणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या अधिकारी, कारभाऱ्यांना नम्र विनंती आहे की, एकदा  साक्री रोडच्या  कचरा प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा आणि पालिकेला स्वच्छतेचा मानंकनाचा जो मोठा पुरस्कार मिळाला तो सार्थकी ठरवा. भविष्यातही पालिकेला पुरस्कार मिळतीलही. पण अशा पुरस्कार प्राप्त महापालिकेची ‘मन्हा मामान्या शंभर गायी, सकाय उठी काही ना माई’ अशी शोभा होऊ नये यासाठी  ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांनी पालिकेला ‘जरतारी’ शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

 तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध