Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
निर्भीड झंझावात : शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे आज ( दि.२३ जानेवारी ) त्यांची जयंती,यानिमित्त तरुण गर्जना वृत्तपत्र समुहा कडून शब्दपुष्पांजली
निर्भीड झंझावात : शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे आज ( दि.२३ जानेवारी ) त्यांची जयंती,यानिमित्त तरुण गर्जना वृत्तपत्र समुहा कडून शब्दपुष्पांजली
रोखठोक भूमिकांनी भल्याभल्या राजकारण्यांना घाम फोडणारं राजकारणातील जाज्वल्य व्यक्तिमत्व म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.अमोघ वक्तृत्व, जादूई नेतृत्व आणि बिनधास्त व्यक्तिमत्वाच्या या महानेत्यानं अख्या महाराष्ट्रावर गारुड केलं. एक पक्ष, एक मैदान आणि एक नेता अशी ख्याती असलेल्या महाराष्ट्राच्या या महानेत्याची कीर्ती सर्वदूर पोहचली.अवघ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील लोकप्रिय नेतृत्व म्हणजे काय असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरे होय.'वाघा'सारखी चौफेर नजर असलेल्या बाळासाहेबांचे कर्तृत्व अथांग आणि उतुंगच ठरले. बाळासाहेब ठाकरे..फक्त हे नाव जरी मनात आले की एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली कणखर नेता, शिवसेनेचे संस्थापक,निर्भीड राजकारणी,कुशल व्यंगचित्रकार, सामना वृत्तपत्राचे संस्थापक,संपादक, आणि प्रभुत्व शैली असणारे व्यक्तिमत्त्व डोळ्यापुढे उभा राहतं.तडाखेबंद वक्तृत्व आणि संपादकीयमधील शाब्दिक फटकाऱ्यांतुन त्यांनी अनेकांना घायाळ करतानाच जमिनीवर आणण्याचे काम केले.मात्र हे करताना त्यांनी कुणाचीही आणि कसलीही भीडभाड ठेवली नाही.
सुरुवातीपासून अखेरपर्यंत त्यांनी मराठी अस्मितेचा नारा दिला. मराठी मातृभाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे, त्या राजभाषेचा अपमान कदापि सहन करणार नाही अशी बाळासाहेबांची सडेतोड भूमिका होती. म्हणूनच बाळ ठाकरे यांनी मराठी मनावर अधिराज्य केले आहे.त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मराठी आणि हिंदुत्ववादाचा भगवा सतत फडकवत ठेवला तो कायमपणे.व्यंगचित्रकार ते महानेता असा त्यांचा अतुलनीय प्रवास निश्चितच विलक्षण म्हणावा लागेल.
प्रबोधनकारांच्या या 'बाळा'चा जन्म २३ जानेवारी १९२६ मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार तर त्यांच्या आईचे नाव रमाबाई.त्याकाळात प्रबोधनकारांनी लेखन,वक्तृत्व आणि समाजकार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा प्रतिकूल परिस्थितीतही यशस्वीपणे सांभाळली. अन्यायकारक रूढी-परंपरा व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर ते कडाडून हल्ला चढवत असत.संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते.
प्रबोधनाचा,पुरोगामी विचारांचा व आक्रमकवृत्तीचा प्रबोधनकारांचा हा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला. बाळासाहेबांचे लग्न मीनाताई यांच्याशी झाला. बाळासाहेबांना 3 अपत्ये.बिंदूमाधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे.
सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून बाळ ठाकरे यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. सन १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. तिथे काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थां, कंपन्या व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातींचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.पुढे त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्यासमवेतही काहीकाळ काम केले.
बाळासाहेबांनी नंतरच्या काळात नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी ऑगस्ट,१९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले.‘मार्मिक’ हे नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. व्यंगचित्रांमधून चेहरा कोणाचा हे जर लिहावं लागत असेल तर ती व्यंगचित्रकाराची कमतरता समजावी. व्यंगचित्र हे नेहमीच परिणामकारी असतं कारण त्याच्यामागे विचार असतो. त्यामुळे ते व्यंगचित्र पाहणाराही विचार करु लागतो. एका व्यंगचित्राची बरोबरी १०० अग्रलेखांशी होत असते.असे बाळासाहेबांचे मत होते.
‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला 'मार्मिक'ने वाचा फोडली.महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला.१९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत,तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठीजनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत कार्यरत आहे.
महाराष्ट्रात निर्माण झालेले मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत,असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेव'ची गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा हा त्यांचा विचार होता. त्यासाठी बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी ‘शिवसेने'ची स्थापना केली. सुरुवातीचा काळ शिवसेनेसाठी काही चांगला नव्हता पण जशी वेळ सरत गेली तशी शिवसेना वाढत गेली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत,पण मराठी माणूस दुविधेत आहे.महाराष्ट्रात उद्योग आहेत,पण मराठी तरुण बेरोजगार तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब.ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या नेत्याने ओळखली.महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच प्रामुख्याने मुंबईत मागे.हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मग मराठी माणूस शिवसेनेच्या झेंड्याखाली संघटित झाला.
शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला.या मेळाव्यास सुमारे पाच लाख लोकांनी गर्दी केली.
या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून शिवतीर्थ, बाळासाहेब आणि गर्दी हे गणित तयार झाले. वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हे देखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो.शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक-वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. बाळासाहेब संपादक असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखांबद्दल लोकांना कायमच उत्सुकता होती. सुरुवातीच्या काळात सामनामध्ये फक्त व्यंगचित्र प्रकाशित होत होते.
काळानंतर हे शिवसेनेचे मुखपत्र बनले. सामना वृत्तपत्राची भाषा रोखठोक असल्याने लोकांना टोचेल, तिखट असेल, पण लोकांनी वाचताना त्यातील विषयाचे गांभीर्य समजावे, हा त्यामागचा हेतू होता. आज देखील शिवसेनेचे निर्भीड मुखपत्र अशीच "सामना"ची ओळख आहे.
बाळासाहेब व भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भाजप युती आकारास आली. पुढे शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे, दौऱ्यांमुळे सन १९९५ मध्ये शिवसेना-भाजपचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आणि मनोहर जोशी शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्या अर्थाने पहिले काँग्रेसेतर सरकार होते.
हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला,हे कुणीही नाकारु शकत नाही.हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही बाळासाहेबांनी आपले विचार नेहमीच रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट,देशविघातक कृत्ये घडवणार्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही.मतपेटीच्या राजकारणासाठी कुणाचेही लांगुलचालन कोणी करू नये,अशी त्यांची ठाम भूमिका होती.
देशद्रोह्यांविरुद्ध बोलणे हा देशात गुन्हा ठरत असेल तर हा गुन्हा आम्ही जीवनाच्या अंतापर्यंत करीत राहू.कुणी तक्रारी केल्या काय किंवा त्या तक्रारींवर कारवाई झाली काय, आम्हाला फिकीर नाही,अशा स्पष्ट आणि जहाल भूमिकेमुळे ते ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले.
झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग,मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण...अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यामागचा विचारही बाळासाहेबांचाच.त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली. इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये हाच फरक आहे. शिवसेनेच्या विरोधकांनीही कधी ते नाकारले नाही.
जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था, साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही.तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार,त्यांची नाडी ओळखून आक्रमक शिवसेनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे,अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता राजकारण करण्याची पद्धतही खास बाळासाहेबांचीच होती.
अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक,प्रचार,पद,पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते. बाळासाहेबांचे उग्र विचार आणि वक्तव्यांमुळे त्यांच्या विरुद्ध अनेकदा खटले दाखल झाले पण कधी त्याची फिकीर केली नाही. त्यांची अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली असली तरी आपल्या भूमिकेपासून कधीही मागे हटले नाहीत. जे बोलतो ते ठामपणे करुन दाखवतो, अशीच बाळासाहेबांची ओळख होती.
बाळासाहेबांना २५ जुलै २०१२ रोजी श्वासोच्छ्वासाचा त्रास होवू लागल्याने उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. १४ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांची तब्येत खालावली. अखेर १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले. शिवाजी मैदान येथे सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत अफाट जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सामील झाला होता. बाळासाहेबांचे निधन झाले असले तरी आजही प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात त्यांचे विचार चिरंतन आहेत. लाखो लोकांचे बाळासाहेब ठाकरे हे स्फूर्तिस्थान होते व आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा