Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २० मार्च, २०२२

९५ व्या चवदारतळे स्मृतीदिनाला भिमसागर लोटला जय भीमच्या जयघोषाने महाड दुमदुमून गेले महाड



महाडमध्ये चवदारतळे सत्याग्रहाच्या ९५ व्या स्मृतीदिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये भिमसागर लोटला. यामुळे महाड शहर तसेच चवदारतळे, क्रांतीस्थंभ परिसर जय भिमच्या घोषणांनी दणाणून गेला. चवदारतळ्याचा ज्या पायऱ्यांनी बाबासाहेब खाली उतरले आणि पाण्याला स्पर्श केला त्या पायऱ्यांवर भीम अनुयायांनी पाणी प्राशन करण्यासाठी आणि चवदारतळ्याचे पाणी कलशातून घेवून जाण्यासाठी एकच गर्दी केली होती.
बाबासाहेबांचा लढा अमानवी संस्कृती च्या विरोधात होता, अशी माणूसहीन संस्कृती बदलण्याचे काम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले - ना. जितेंद्र आव्हाड
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीमुळे आपल्याला अस्तित्व प्राप्त झाले - अदिती तटकरे पालकमंत्री रायगड
चवदार तळे सामाजिक क्रांतीचा स्मृतिदिन ऊर्जा आणि प्रेरणा देणारा - राहुल बोधी महाथेरो
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये जागतिक पातळीवरील सामाजिक क्रांती केली. या क्रांतीचा ९५ वा स्मृतिदिन आज महाडमध्ये साजरा झाला. यावेळी विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्रातून उसळलेल्या भिमसागरामुळे चवदारतळे परिसर भीम जयघोषाने दणाणून गेला. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, बौद्धजन पंचायत समितीच्या मीराताई आंबेडकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, महाराष्ट्र शासनाचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री अदिती तटकरे आदी दिग्गज नेत्यांनी महाडमध्ये अभिवादन केले. त्याचबरोबर दिल्ली शासनाचे सामाजिक न्याय मंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी देखील महाड मध्ये बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केले.
स्थानिक प्रशासनाकडून क्रांतीस्थंभ आणि चवदारतळे याठिकाणी मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य पथक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथील विविध संस्थांनी मोफत भोजनदानाची देखील व्यवस्था केली होती. कास्ट्ाईब कर्मचारी महासंघ आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्था महाड, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजीक संस्था, हिंदूस्थान पेट्ोलीयम एस.सी - एस.टी.कामगार संघटना, भारतीय आयुर्वीमा महामंडळ एस.सी.एस.टी.कामगार संघटना, पोलादपूर सहकारी सरकारी कर्मचारी पतसंस्था, एकविरा पतसंस्था, चवदार तळे विचार मंच, आदी संघटना तसेच संस्थांकडून मोफत भोजनदान तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रभाकर नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे धम्मज्योति गजभिये, पूजनीय राहुल बोधी महाथेरो, शाहीर संभाजी भगत, आदी उपस्थित होते. यावेळी प्रेम हनवते लिखित महारांची शौर्यगाथा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
फ्लेक्स फलकानी चवदारतळे झाकले
महाडमध्ये केवळ २० मार्च रोजी येणाऱ्या या विविध संघटनाकडून मोठ्या प्रमाणात आपल्या प्रसिद्धीचे फलक लावण्यात येतात. याची तयारी दोन दिवस आधीपासूनच केली जाते. टेम्पो भरून हे फलक महाडपर्यंत आणले जातात आणि महाडमधील रस्ते, शासकीय इमारती, चवदारतळे या फलकांनी झाकून टाकले जाते. चवदारतळे हे तमाम आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान असल्याचा विसर या नेत्यांना होतो. तळ्याचे सौंदर्य आणि येथील पाण्याला स्पर्श करण्यासाठी येणाऱ्या भीमसागराला या फलकांचे विचित्र दर्शन पहावयास मिळते. यामध्ये स्थानिक नेते देखील मागेपुढे पाहत नाहीत. एकीकडे हे फ्लेक्स फलक पर्यावरणाला हानिकारक असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याच शासनाच्या मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे फ्लेक्स फलकबाजी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध