Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ मार्च, २०२२

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे हस्ते 'मनमाड ते मुदखेड या विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ



  भारत सरकारचे रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी 12 मार्च 2022 रोजी जालना स्थानकावर 'मनमाड ते मुदखेड या विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ 'ट्रॅक्शन उपकेंद्राची पायाभरणी, भुमिपुजन आणि विद्युतपोल उभा' करुन केला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे, खा.संजय जाधव, माजी मंत्री आ.अतुल सावे, आ.कैलास गोरंट्याल, आ.नारायण कुचे, आ.प्रशांत बंंब, आ.संतोष दानवे, स्थानिक लोकप्रतिनिधीं आणि दक्षिण मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री ए.के.जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री उपेंद्र सिंग, नांदेड विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते.
याप्रसंगी श्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भारतीय रेल्वे सध्याच्या मोठ्या लाईन मार्गांसह सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्याच्या मोहिमेवर आहे.  ते म्हणाले की, एससीआरचा मनमाड-मुदखेड विभाग हा मराठवाड्यातील महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे.  मनमाड-मुदखेड विद्युतीकरण प्रकल्प पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि या भागाला सर्व दिशांनी अखंड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. 357 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 484 कोटी रुपये खर्च येणार आहे. रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणामुळे कार्बन उत्सर्जन आणि इंधनाचा खर्च कमी होईल तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल, असेही ते म्हणाले.  ते पुढे म्हणाले की, संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कवर समर्पित फ्रेट कॉरिडॉर पूर्ण करणे आणि रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या कामांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद अनेक पटींनी वाढून रु.1100 कोटीं वरून रु. 11,000 कोटी केली आहे. मनमाड ते परभणीपर्यंतच्या दुहेरीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. माननीय रेल्वे राज्यमंत्री म्हणाले की, मुंबई-नागपूर;  मुंबई-पुणे-हैदराबाद विभागात हायस्पीड ट्रेन सुरू करण्यासाठी डीपीआरचे (तपशीलवार प्रकल्प अहवाल) काम जोरात सुरू आहे.  याशिवाय टप्प्याटप्प्याने 400 वंदे भारत गाड्या सुरू करण्यात येणार असून महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणात वंदे भारत गाड्या मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनमाड ते मुदखेडपर्यंतच्या रेल्वे विद्युतीकरणाच्या कामाची ठळक वैशिष्ट्ये:
महाराष्ट्र राज्याचा मराठवाडा विभाग, जो प्रामुख्याने दक्षिण मध्य रेल्वेच्या सेवा क्षेत्रांतर्गत येतो, अलीकडच्या काळात रेल्वेच्या विकासाचा साक्षीदार आहे. पायाभूत सुविधा वाढवण्यावर आणि प्रदेशाला सर्व दिशांनी अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यावर विशेष भर दिला जात आहे.  या दिशेने आणखी चालना देण्यासाठी मराठवाडा विभागात रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाच्या कामांचे उद्घाटन करण्यात येत असून त्यामुळे या महत्त्वाच्या प्रदेशातील रेल्वे व्यवस्था अधिक बळकट होईल.
भारतीय रेल्वेने त्याच्या नेटवर्कमध्ये अखंडित रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी 2023 पर्यंत ब्रॉडगेज मार्गांमध्ये सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करण्याची योजना आखली आहे.  SCR चा मनमाड – मुदखेड विभाग हा मराठवाडा विभागाचा एक महत्त्वाचा रेल्वे दुवा आहे जो देशाच्या पश्चिम भागाला दक्षिण भागाशी जोडतो.  हा विभाग मराठवाडा विभागाला पश्चिमेला आर्थिक राजधानी मुंबई, दक्षिणेला हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नई आणि पूर्वेला नागपूर आणि बिलासपूर या महत्त्वाच्या शहरांशी जोडतो.  या विभागाचे महत्त्व लक्षात घेऊन मनमाड-मुदखेड-धोन विद्युतीकरण प्रकल्पांतर्गत मनमाड-मुदखेड-नांदेड विभागाच्या विद्युतीकरणास मान्यता देण्यात आली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध