Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २० मार्च, २०२२

अगदीच तकलादू कामामुळे धुळे साक्री रोडवर गटारीने पंधरवाड्या पासून नागरीकांची वाट रोखली राष्ट्र सेवा दल साक्री रोड शाखेचा पालिकेला श्रमदानाचा इशारा



धुळे- येथील साक्री रोडवरील मित्रकुंज कॉलनी व विद्यावर्धिनी प्राध्यापक वसाहतीला लागून असलेल्या मलेरिया ऑफीस ते साक्री रोडवरील बिघडलेल्या  सुमार रस्त्यावर खोदून ठेवलेल्या नालीमुळे गेल्या 15 दिवसापासून रहदारी बंद असून पालिकेने रस्त्यावरील खोदलेल्या नालीतील मातीचे ढिगारे त्वरीत उचलून रस्ता सुरळीत करावा, पालिकेच्या कारभाऱ्यांना अशक्य असेल तर असमर्थता दर्शवित तसे त्यांनी जाहीर करावे; म्हणजे साक्री रोड परिसरातील राष्ट्र सेवा दलाचे सैनिक श्रमदानाने तो ढिगारा उचलतील  असे आवाहन साक्री रोड परिसरातील सेवा दल सैनिक व ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांनी एका पत्रकाद्वारे महानगरपालिकेतील कारभाऱ्यांना केले आहे.
साक्री रोड राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पत्रकात पुढे नमुद करण्यात आले आहे की, मलेरिया ऑफीस ते साक्री रोड पर्यंतचा रस्ता मरणसंपन्न असून त्याला कुणीही वाली नाही, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? हे शोधण्याचे काम संशोधकांचे आहे. परिसरातील कर्ते, करविते नेते सांगतात,  रस्त्याचे काम मंजूर झाले आहे हे एैकुन परिसरातील नागरिकही वर्षभरापासून जाम खूष आहेत. पण तो सुदिन कधी येईल? या रस्त्यावरच 15 दिवसापूर्वी  एक गटार खोदून ठेवली. त्यात फक्त तयार पाईप ठेऊन डागडूजी करून खोदलेल्या मातीचे ढिगारे तसेच पडू दिले आहेत. पायी चालणेही अवघड होऊन बसले आहे.  महामार्गांवरील डागडुजींची महाकाय कामे काही तासात पूर्ण होतात, रस्ता सुरळीत होतो एव्हढे तंत्रज्ञान पुढे गेले असतांना या काही फुट कामासाठी एव्हढा विलंब हे अनाकलनीय आहे. या रस्त्यावरून परिसरातील शेकडो वसाहतीतील नागरीकांची साक्री रोडच्या दिशेने रोज ये जा सुरु असते. सर्वच जण जवळच सुरु असलेल्या बंगल्याच्या बांधकामावरील मजुरांशी वाद घालतात आणि दमाच्या भाषेत विचारतात, हा ढिगारा कधी उचलणार? वास्तविक बिचाऱ्या त्या मजुरांचा ढिगाऱ्याशी दुरान्वेही संबंध नाही. सर्वस्वी जबाबदारी ‘विकासासहीत सेवा’ याची  हमी देणाऱ्या धुळे महापालिकेची आहे. ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’
गेल्या पंधरवाड्यात परिसरातील कॉलनीतून अनेक प्रेतयात्राही इकडून गेल्या पण ज्या माणसांनी रोज या रस्त्याने पायपीट केली असेल त्यांचीही मृत्युनंतर या ढिगाऱ्यांनी वाट रोखली. प्रेतयात्रा वळसा घालून न्यावी लागली. मयत माणसांची ही अवस्था तर जिवंत माणसांचे काय? असा सवालही पत्रकातून व्यक्त करण्यात आला आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध