Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मे, २०२२

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना जून‌अखेर मिळणार १० हजार कोटींचे प्रोत्साहन अनुदान



सोलापूर प्रतिनिधी : दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून २०२०पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.नियमित कर्जदार शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी पाठविली असून त्यातून आता पात्र शेतकरी निवडले जात आहेत. पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारकडून दहा हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करीत काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.

सरकारने सुरवातीलाच कर्जमाफीचा निर्णय घेतला.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दीड लाखांची कर्जमाफी दिली.दीड लाखांवरील थकबाकीदारांनाही एकरकमी परतफेड योजनेतून (ओटीएस) कर्जमाफी दिली.नियमित कर्जदारांना २५ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने त्यात वाढ करून दोन लाखांची कर्जमाफी केली.पण,अद्याप दोन लाखांवरील थकबाकीदारांचा निर्णय झालेला नाही.आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. 


ज्यांचे कर्ज ५० हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना कर्जाएवढीच रक्कम प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्यांच्याकडील नियमित कर्जदारांची यादी सहकार विभागाला सादर केली आहे त्याची छाननी सुरु असून आयकर भरणारे,सरकारी कर्मचारी,स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अशा घटकांना त्यातून वगळले जाणार आहे.साधारणत:जूनअखेर पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान वितरीत केले जाणार आहे.पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकते.तत्पूर्वी, मंत्रिमंडळाची बैठक होणार असून प्रोत्साहनपर अनुदान देताना दोन लाखांपर्यंतच्या ज्या पात्र कर्जदारांना लाभ मिळालेला नाही,त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध