Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ जून, २०२२

राजेंद्र बंब हा धुळ्यातील एक मोठा एलआयसी एजंट एका पीडिताने या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा हा कारनामा आला समोर



धुळे प्रतिनिधी:धुळ्यातील अवैध सावकार राजेंद्र बंब कारवाई प्रकरणी आजदेखील मोठी बातमी समोर आली आहे. राजेंद्र बंब याच्याकडे तिसऱ्या दिवशीही मोठे घबाड सापडले आहे. गुन्हे शाखेच्या तिसऱ्या दिवसाच्या तपासणीत तब्बल 5 कोटी 13 लाख 44 हजार 530 रुपयांची रोकड सापडली आहे. तर 5 कोटी 54 लाख रकमेचे सुमारे 10 किलो 563 ग्राम सोने आढळले आहे. तसेच 7 किलो 621 ग्रॅम चांदीही जप्त करण्यात आली. तपास यंत्रणेने आज एकूण 10 कोटी 73 लाख रुपये रोकड आणि सोने जप्त केले आहे. तपास यंत्रणा गेल्या तीन दिवसांपासून बंबची संपत्ती मोजत आहे.आतापर्यंत तब्बल 14 कोटींहून अधिक किंमतीचे सोने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

एलआयसी किंग अशी ओळख असलेला धुळ्यातील विमा एजंट राजेंद्र बंब याच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत कोट्यवधींचं घबाड हाती लागलं होतं.त्यानंतर राजेंद्र बंब हा अवैध सावकारी करत असल्याचं उघड झालं.याच प्रकरणात राजेंद्र बंब याच्या बँक लॉकरची पोलिसांनी तपासणी केली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राजेंद्र बंब याच्या जळगाव जनता बँकेतील लॉकर तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँक लॉकरमधून तब्बल दोन कोटी 54 लाख रुपयांची रोकड तर 19 लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 1 कोटी 42 लाख यांची रोकड तर 46 लाखांचे सोने करण्यात आले जप्त करण्यात आले होते.

नेमका प्रकार काय?

राजेंद्र बंब हा धुळ्यातील एक मोठा एलआयसी एजंट आहे.त्याला एलआयसी किंग असंही म्हटलं जातं.धुळे शहरात एका बनावट फायनान्स कंपनीच्या नावे कर्ज देऊन राजेंद्र बंब हा अवैधरित्या 24 टक्के दराने वसुली करत असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.एका पीडिताने या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा हा कारनामा समोर आला आहे.

राजेंद्र बंब याच्याकडे कामाला असलेल्या एका व्यक्तीला पैशांची गरज होती. त्यावेळी बंब याने त्याला पैसे दिले आणि पैशांच्या मोबदल्यात त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीचे कागदपत्र बंब याने आपल्या ताब्यात ठेवले.व्याजासकट पैसे परत करूनही बंब याने त्या व्यक्तीला कागदपत्रे दिली नाहीत.काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी अवैध सावकारी विरोधात तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले. पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पीडित व्यक्तीने पोलिसांची भेट घेतली आणि त्यानंतर घडलेला प्रकार सांगितला.यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करत तपास सुरू केला.त्यानंतर बंब याच्या घरी धाड टाकली असता कोट्यवधींचं घबाड हाती आलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध