Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २४ जून, २०२२

पिंपळनेर तहसीलदारा सह खाजगी इसम लाच लुचपत विभागाच्या ताब्यात,२५ हजारांची रुपये लाचेची मागणी.



जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिपळनेर अपर तहसिलदार श्री.विनायक थवील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रु. २५ हजारांची लाच स्विकारताना अटक करण्यात आली आहे.याबात मिळालेली माहिती अशी कि,तक्रारदार हे पिंपळनेर येथील रहीवाशी असुन त्यांनी मौजे ढोलीपाडा येथे नवीन अविभाज्य शर्तीच्या शेत जमिनीचा खरेदीचा व्यवहार रजिस्टर सौदा पावतीने केला असुन सदरची शेतजमिन भोगवटादार वर्ग-१ होणे करिता शेतजमिनीचे मालक यांनी दि. २३.०९.२०२१ रोजी अप्पर तहसिलदार यांच्याकडे अर्ज केला आहे. 

सदर प्रकरणात अपर तहसिलदार श्री. विनायक थवील यांनी दि.०४.०५.२०२२ सदर प्रकरणात ७/१२ उतारे व नोंदी सादर केलेल्या नाहीत. हे कारण दाखवुन सदरचे प्रकरण तृर्तास निकाली काढले होते. त्यांनतर तक्रारदार यांनी सदर प्रकरणातील कागदपत्राची पुर्तता करून वेळोवेळी श्री. विनायक थवील,तहसिलदार यांची भेट घेतली.त्यांनी सदर प्रकरणांचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी धुळे कार्यालयात पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे २५,०००/-रू लाचेची मागणी केल्याची दुरध्वनी द्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयास माहिती दिली होती. 

त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधकाचे पथकाने पिंपळनेर येथे जावुन तक्रारदार यांचे तक्रार नोंदवुन घेतली होती
सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. ०८/०६/२०२२ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान वरील तहसिलदार श्री.विनायक सखाराम थवील यांनी खाजगी इसम संदीप मुसळे यांच्याकरवी तडजोडीअंती २५,०००/- रु. लाचेची मागणी केली होती.परंतु त्यांना तक्रारदार यांच्या बाबत शंका आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडुन लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. अशाप्रकारे तहसिलदार विनायक सखाराम थवील यांनी खाजगी इसम संदीप मुसळे यांस प्रोत्साहीत करून तक्रारदार यांच्या कडे लाचेची मागणी केली.म्हणुन नमुद आरोपीतांनी स्वतः चे आर्थिक फायद्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशिर मार्गाचा अवलंब करून अनाधिकाराने पदाचा दुरुपयोग केला असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम व ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रकाश झोडगे, श्री. मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके,कैलास जोहरे,भुषण खलाणेकर,गायत्री पाटील,भुषण शेटे संदीप कदम,संतोष पावरा,सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली आहे. 

तसेच सदरच्या कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा.श्री. सुनिल कडासने,अपर पोलीस अधीक्षक मा.श्री.नारायण न्याहाळदे व वाचक पोलीस अधीक्षक मा.श्री.सतिष भामरे यांच्या मार्गदर्शन लाभले असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध