Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

आकांक्षित जिल्हा कृषी विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न..!



नंदुरबार, दि.1प्रतिनिधी : आयटीसी मिशन सूनहरा कल,डॉ.हेडगेवार सेवा समिती व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र,नंदुरबार येथे आकांक्षित जिल्हा कृषी विकास कार्यक्रम कृषी व जलस्त्रोत विषयावरील जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.


या कार्यशाळेच्या उद्धाटक म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री तसचे प्रमुख अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एस.बी.खरबडे,डॉ.हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त अध्यक्ष स्वप्नीलभाई पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे, कृषी विज्ञान केंन्द्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर.एस.दहातोंडे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यू.डी.पाटील, विभागीय विस्तार केंद्र प्रमुख,श्रीधर देसले आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी, आयटीसी मिशन सूनहरा कल’तर्फे आकांक्षीत जिल्हा कृषी विकास कार्यक्रमाची रूपरेषा तसेच गेल्या चार वर्षात आयटीसी मार्फत करण्यात आलेल्या कामाची माहिती तसेच आगामी काळात प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली.  

श्री.खरबडे,यांनी नंदुरबार जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हाकडून विकसित जिल्हा होण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठ,कृषी विज्ञान केंद्र तथा कृषी विभाग यांचा मोलाचा वाटा असल्याचे तसेच जिल्ह्याच्या व शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या समन्वयाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. 

श्री.भागेश्वर,यांनी कृषी विभागामार्फत केलेल्या विविध उपक्रमांची तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या योजनाबद्दल मार्गदर्शन केले, व शेतकऱ्यांच्या विकासासाठी व जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचाविण्यासाठी कृषी विभाग पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी नंदूरबार जिल्ह्याच्या व शेतकऱ्याच्या विकास कार्यात डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदूरबार सर्वांच्या सहकार्याने पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात आयटीसी मिशन सुनहरा कल प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण उपक्रमांची तसेच कृषी आदर्श गाव प्रकल्पाची विस्तृत स्वरूपात माहिती देण्यात आली तसेच हे उपक्रम कृषी विभागामार्फत जिल्हास्तरावरील सर्व गावांमध्ये राबविण्यासाठी चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी श्रीमती.मनीषा खत्री तसेच इतर मान्यवरांनी ‘आयटीसी मिशन सुनहरा कल’ मार्फत तयार करण्यात आलेल्या विविध प्रशिक्षण साहित्य, किसान डायरी, योजना पुस्तिका व इतर उपकरणाची प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्रीमती.खत्री यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ यू.डी.पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रकल्प समन्वयक तृप्ती चोरमले यांनी केले. कार्यक्रमास कृषी विभाग,जिल्हा परिषद,पशू संवर्धन विभाग, कृषी विद्यापीठ,कृषी विज्ञान केंद्र व इतर शासकीय विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल पाटील,गोकुळ खलाने,राहुल पाडवी,संदीप पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध