Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

महिन्याला १ रुपयात मिळाले २ लाखाचे विमा संरक्षण...

परंडा (राहूल शिंदे) दि.२४ तालुक्यातील सक्करवाडी येथील रमेश चव्हाण या शेतकऱ्याचे  अपघाती निधन झाले होते.त्यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत १२ रू वार्षिक इन्शुरन्स एस.बी.आय ग्राहक सेवा केंद्र चिंचपूर बु.येथे भरला होता.त्यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी राधा चव्हाण यांना आज सोनारी शाखेचे शाखा प्रमुख गुप्ता साहेब व चिंचपूर बु.ग्राहकसेवा केंद्र चालक दत्तात्रय भोगील यांच्या पाठपुराव्यांने धनादेश मंजूर करण्यात आला.
यावेळी गुप्ता म्हणाले की, विमा आज प्रत्येक व्यक्तीसाठी खूप आवश्यक झाला आहे. विशेषतः जर तुम्ही कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी विमा अतिशय गरजेचा आहे. अशात कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सरकारने अनेक विमा योजना सुरू केल्यात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अशीच एक योजना आहे.पीएम सुरक्षा विमा योजनेची खासियत म्हणजे ती खूपच स्वस्त आहे. 

दरमहिन्याला फक्त १ रुपया खर्च करुन २ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला एका वर्षात फक्त १२ रुपये प्रीमियम भरावा लागेल. विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला २ लाख रुपये मिळतात. जर विमा उतरवलेली व्यक्तीचा अपघात झाला तर त्याला एक लाख रुपये मिळतात.

विमा पॉलिसी कोण खरेदी करू शकतं?
१८ ते ७० वर्षे वयाची कोणतीही व्यक्ती पीएम सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकते. यासाठी तुमचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. पॉलिसी पुढील वर्षी १ जून ते ३१ मे पर्यंत वैध असेल. दरवर्षी त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते. ही मुदत योजना आहे, त्यामुळे व्यक्तीने भरलेला प्रीमियम परतावा मिळत नाही.

पॉलिसीधारकाचा अपघात झाल्यास ३० दिवसांच्या आत दावा करावा लागेल. क्लेम सेटल होण्यासाठी जास्तीत जास्त ६० दिवसांचा कालावधी लागतो. या पॉलिसीचा प्रीमियम तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापला जातो. म्हणूनच तुमच्या बँक खात्यात शिल्लक असणे महत्त्वाचे आहे.

तरी जास्तीतजास्त लोकांनी आपल्या भविष्याचा विचार करून आपला इन्शुरन्स काढून घ्यावा असे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध