Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडाचे सरपंच सरदार पावरा अपात्र घोषित; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आदेश...!






प्रतिनिधी,शिरपूर: तालुक्यातील जामण्यापाडा गावाचे सरपंच सरदार हरदास पावरा यांनी कधीच मासिक सभा घेतली नसल्याची ग्रा. पंचायत सदस्य विलास पावरा यांच्या तक्रारीवरून झालेल्या सुनावणीत सरपंच यांना उर्वरित कालावधिकरीता सरपंच, उपसरपंच आणि सदस्य म्हणूनही अपात्र घोषित करण्याचा निकाल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिला.या निर्णयाने कागदोपत्री कामकाज करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ग्राम पंचायत सदस्य विलास पावरा यांनी सरपंच सरदार पावरा,ग्रामसेवक बी.एन.पावरा,उपसरपंच शोभा दिनेश पावरा यांच्या विरोधात मासिक सभा कधीच घेत नसल्याची तक्रार गट विकास अधिकारी शिरपूर यांच्याकडे केली होती.तक्रारीवरून चौकशी अहवाल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे पाठवण्यात आला होता. सुनावणी अंती जिल्हाधिकारी यांनी मुंबई ग्राम पंचायत (सभांबाबत) नियम,चा नियम 3 व महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1959 मधील कलम 36 मधील तरतुदी नुसार उर्वरित कालावधिकरीता सरपंच सरदार हरदास पावरा यांना पंचायतिचा सरपंच म्हणून चालू राहण्यास किंवा पंचायतिच्या सदस्याचा उरलेल्या कालावधिसाठी असा सरपंच किंवा उपसरपंच म्हणून निवडला जाण्यास अपात्र घोषित करण्याचा निकाल दिला. सदर निर्णयामुळे तक्रारदार तथा ग्राम पंचायत सदस्य विलास पावरा यांनी समाधान व्यक्त केले. तर दुसरीकडे या निर्णयाने कागदोपत्री कामकाज करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकशाहीच्या मजबूतीसाठी गाव विकासासाठी ग्रा.पं.च्या मासिक सभा आवश्यक आहेत.केवळ कागदोपत्री सभा घेवून गावाला मूर्ख बनवत होते. मात्र गाव विकासासाठी असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही.

विलास पावरा तक्रारदार तथा ग्रा. पं. सदस्य जामण्यापाडा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध