Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

आलोसे कार्यकारी अभियंता यांना शहादा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष साडेतीन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले



नंदुरबार प्रतिनिधी:- येथील तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार होते तक्रारदार यांनी मागील सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्ग,प्रमुख राज्य मार्ग अशा विविध रस्त्यांच्या नवीन डांबरीकरणाची व डागडुगीची कामे पूर्ण केली आहेत.तसेच सध्याच्या कालावधीत तक्रारदार यांच्या तीन नवीन कामांच्या निविदा मंजूर होऊन त्यांचे कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग,धुळे या कार्यालयाकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,शहादा या कार्यालयात आले आहेत.परंतु नमूद तिन्ही कामांचे कार्यारंभ आदेश आज रोजीपावतो तक्रारदार यांना मिळालेले नाहीत.तक्रारदार यांनी पूर्ण केलेल्या कामांबाबतची तीन कोटी 92 लाख 79 हजार 285 रुपये एवढी बिलाची प्रलंबित रक्कम काढणे व याव्यतिरिक्त प्रस्तावित असलेल्या तीन कामांचे पाच कोटी 33 लाख रुपये एवढ्या रकमेचे कार्यारंभ आदेश मिळणेकामी आलोसे श्री महेश प्रतापराव पाटील, कार्यकारी अभियंता वर्ग १,सार्वजनिक बांधकाम विभाग,शहादा,जिल्हा नंदुरबार यांच्याकडे तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला व अनेक वेळा विनंती केली.परंतु आलोसे यांनी बिलाची रक्कम मंजूर केली नाही.तसेच कार्यारंभ आदेश सुद्धा दिले नाहीत. यानंतर तक्रारदार यांनी आलोसे‌ यांना विनंती व पाठपुरावा केला असता तक्रारदर यांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी वेळोवेळी १०% व तीन्ही कार्यारंभ आदेश देण्यासाठी ०.७५% ते १ अशा टक्केवारीच्या स्वरूपात एकत्रित 43 लाख रुपये एवढ्या लाचेच्या रकमेची मागणी केली.

नमूद मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी ०३ लाख ५० हजार रुपये अशी रक्कम आलोसे महेश पाटील यांना त्यांच्या शहादा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.सदर बाबत शहादा पोलीस स्टेशन जिल्हा नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत चालू होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध