Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ५ मे, २०२३

वन विभागाच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महसूल,पोलिस व वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिक्रमणधारकांनी केली जोरदार दगडफेक



रावेर प्रतिनिधी:- रावेर पाल (ता. रावेर),ता.४ : सातपुडा पर्वतरांगांच्या जंगलातील गारबडी (ता.रावेर) गावाजवळ स्थानिकांनी वन विभागाच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महसूल,पोलिस व वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिक्रमणधारकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना आज (ता.४) दुपारी एकच्या सुमारास घडली. यामुळे पाच 'जेसीबी' चे मोठे नुकसान झाले 'असून एका 'जेसीबी' चालकाला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.या घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ
उडाली आहे.


याबाबत माहिती अशी,की गारवडी गावाजवळील मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या कंपार्टमेंट क्रमांक २४ आणि २५ मध्ये दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असलेले वन विभागाच्या कर्मचान्यांना दिसले होते.त्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना हटकले असता,त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती.त्यामुळे आज वन विभागाच्या विनंतीनुसार महसूल व पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. यात रावेरचे तहसीलदार बी.ए.कापसे, परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे,फैजपूरचे विभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे,रावेरचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक,मंडळाधिकारी सचिन पाटील, वन विभागाचे अजय बावने, श्री. हडपे तसेच रावेर, सावदा, निंभोरा येथील पोलिस व वन विभागाचे कर्मचारी मिळून १५० जणांचा सहभाग होता. अतिक्रमण काढण्यासाठी मोठा फौजफाटा आल्याचे पाहून अतिक्रमण करणारे संतप्त झाले.अशातच 'जेसीवी'चा धक्का लागल्याचे निमित्त करून अतिक्रमण करणाऱ्या चाळीस ते पन्नास जणांनी अतिक्रमण काढण्यासाठी विरोध केला व अचानक 'जेसीबींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रचंड दगडफेक केली. ज्यात एक कर्मचारी डोक्याला दगड लागल्याने गंभीर जखमी झाला.
अतिक्रमणधारकांचा संताप काहीसा ओसरल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना शांत करून त्यांच्याशी चर्चा केली.त्यांचा वन हक्क दावा मंजूर नसून त्यांनी अतिक्रमण केलेले आहे,असे सांगून अधिकाऱ्यांनी तेथील चार ते पाच झोपड्या तोडून अतिक्रमण नष्ट केले. तसेच त्यांनी नांगरलेली सुमारे १५ एकर जमीन पुन्हा ताब्यात घेतली.शासकीय कारवाईत अडथळा केल्याबद्दलचा गुन्हा वन विभागामार्फत नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 
ही मोठी कारवाई असल्यामुळे जिल्हाधिकारी अमन मित्तल आणि वनविभागाचे उपवनसंरक्षक या परिस्थितीवर लक्ष ठेवत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध